कल्याणमध्ये चाललंय काय? भटक्या कुत्र्यांवरून प्राणीमित्र-रहिवासी भिडले; 2 गटांत शिवीगाळ आणि धक्काबुक्की

कल्याणच्या राधा नगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक लहान मुले जखमी झाली आहेत. कुत्र्यांना अन्न देणाऱ्या प्राणीप्रेमी संघटनेच्या सदस्यांशी स्थानिकांचा संघर्ष झाला. या वादात शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली, पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला. स्थानिकांची मागणी आहे की, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर पालिकेकडून तात्काळ कारवाई करावी.

कल्याणमध्ये चाललंय काय? भटक्या कुत्र्यांवरून प्राणीमित्र-रहिवासी भिडले; 2 गटांत शिवीगाळ आणि धक्काबुक्की
भटक्या कुत्र्यांना खाणं देण्यावरून कल्याणमध्ये 2 गट भिडले
Image Credit source: social media
| Updated on: Mar 21, 2025 | 7:46 AM

राज्यातील अनेक शहरांत भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून हे कुत्रे येणाऱ्या-जाणाऱ्यांवर हल्ला करतात, लहान मुलांना चावत असतात. त्यामुळे सामान्य नागिरक त्रस्त झाले आहेत,मात्र काही प्राणीप्रेमी याच कुत्र्यांना खायला घालतात. त्यावरून अनेकदा वादही होत असतात. असाच काहीस प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. कल्याम पश्चिमेकडील राधा नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच मुद्द्यावरून प्राणीमित्र संघटना आणि स्थानिक रहिवासी यांच्यात जोरदार वाद झाला. नागरिकांनी कुत्र्यांसाठी रस्त्यावर खाणं टाकण्यास आक्षेप घेतला असता प्राणीमित्र संतप्त झाले आणि दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की परिस्थिती निर्माण झाली. तब्बल दीड तास दोन्ही गटांमध्ये सुरू असलेला हा वाद अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवला.

नेमकं काय झालं ?

कल्याण पश्चिममधील राधा नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. आतापर्यंत या भागात सहा ते सात लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी पालिकेकडे कारवाईची मागणी केली आहे. मात्र रात्रीच्या सुमारास प्राणीमित्र संघटनेचे काही सदस्य भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी येथे येत असतात. घटनेच्या दिवशी देखील असेच काही सदस्य हे कुत्र्यांना खाण देण्यास आले होते होते, तेव्हा स्थानिकांनी त्यांना विरोध केला.

“रस्त्यावर खाणं टाकू नका, या कुत्र्यांमुळे लोकांना त्रास होतो,” असे सांगितल्याने प्राणीमित्र भडकले आणि त्यांनी आपल्या इतर सदस्यांना घटनास्थळी बोलावले. काही वेळातच मोठा जमाव जमला आणि स्थानिक रहिवासी वि. प्राणीमित्र संघटनेचे सदस्य असे दोन्ही गट आमनेसामने आले. सुरू झालेला हा वाद हळूहळू पेटत गेला आणि वातावरण तापलं. वाद वाढतच गेल्याने दोन तास तणावपूर्ण परिस्थिती होती. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत केले आणि वाद मिटवला. मात्र या कुत्र्यांवर कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी कायम आहे.

कल्याण स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांचा हैदोस; वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त !

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. स्टेशन परिसरात अनधिकृत रिक्षा थांबवून प्रवाशांना जबरदस्तीने भाड्याने नेले जात आहे. यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरच प्रचंड गर्दी होत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना वेळेवर ट्रेन पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच स्टेशन परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा चालक आडव्या तिडव्या रिक्षा लावत असल्याने या तून प्रवाश्यांना तारेवरची कसरत करत मार्ग काढून या कोंडीतून बाहेर पडावे लागत आहे त्यात वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे.दररोज प्रवासी व रिक्षाचालकांमध्ये वाद, बाचाबाची, मारामारीच्या घटना वाढल्या असून प्रवाशी संघटना संतप्त होत या बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.