आज माझा तरी शेवट नाहीतर… नवऱ्याच्या विधानाने खळबळ; त्यानंतर बायकोसोबत जे केलं कोल्हापूर हादरलं
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात नवऱ्याने थेट बायकोसाठी केलेल्या विधानाने खळबळ माजली. त्यानंतर त्याने भर बाजारात जे कृत्य केलं ते पाहून अनेकजण हादरले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी एका प्रेमविवाहित जोडीत झालेल्या वादातून पतीने भररस्त्यात पत्नीवर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी पती अद्याप फरार आहे. आता नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या…
नेमकं काय घडलं?
मृत महिलेचे नाव अमृता कांबळे (वय ३०) आहे तर आरोपी पतीचे नाव दीपक कांबळे (वय ३५) आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या या जोडीला दोन मुली आहेत. मात्र, पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय घेत असल्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अमृता कांबळे पेठवडगाव एसटी स्थानकाच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी दीपक तेथे पोहोचला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात दीपकने जवळील कोयत्याने अमृतावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेली अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
विषय संपला म्हणत मिशीवर ताव मारत पळ काढला
घटनेच्या वेळी परिसरात अनेक लोक उपस्थित होते. काही युवकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, दीपकने “ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका,” असे म्हणत पुन्हा हल्ला केला. त्यानंतर “विषय संपवला” असे म्हणत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेसोबत परिसरात जोरदार पाऊस पडत होता.
घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोरख चौधरी, उपनिरीक्षक प्रियांका खाडे व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकाने नमुने जप्त केले आहेत. अमृता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपी दीपक कांबळे याचा शोध घेण्यात येत आहे. शुल्लक गोष्टींवर झालेल्या वाद इतका टोकाला गेला की नवऱ्याने थेट पत्नीचा जीवच घेतला.