योगींच्या राज्यात चाललंय काय?, उत्तर प्रदेशात हत्यांचं सत्र थांबेना, आधी गोरखपूर, आता कानपूर आणि लखनऊमध्ये हत्या

| Updated on: Oct 02, 2021 | 10:38 AM

आता राजधानी लखनऊ आणि कानपूरमध्येही हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. कानपूरच्या बर्रा भाजीमार्केटमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्याची कारमध्येच गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

योगींच्या राज्यात चाललंय काय?, उत्तर प्रदेशात हत्यांचं सत्र थांबेना, आधी गोरखपूर, आता कानपूर आणि लखनऊमध्ये हत्या
सपा नेते हर्ष यादव
Follow us on

लखनऊ: उत्तर प्रदेशातील गुंडाराज काही संपायचं नाव घेत नाही. सपा असो, बसपा असो नाहीतर आता योगींचं सरकार, गुन्हेगारांचं धाडस काही कमी झालेलं नाही. खुद्द यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघ गोरखपूरमध्ये पोलिसांकडून एका व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा आरोप आहे. त्यातच आता राजधानी लखनऊ आणि कानपूरमध्येही हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. कानपूरच्या बर्रा भाजीमार्केटमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्याची कारमध्येच गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे कानपूरमध्ये खळबळ माजली आहे. (Law and order threatened in Uttar Pradesh, killings in Kanpur and Lucknow after Gorakhpur )

विशेष गोष्ट म्हणजे, सपाच्या नेत्याला गोळ्या घातल्यानंतर हे नराधम आरामात पसार झाले. या घटनेनंतर रक्ताने माखलेल्या सपाच्या नेत्याला घाईघाईने दुचाकीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

हर्ष यादव हे समाजवादी पक्षाच्या युवा सभेचे कानपूरचे उपाध्यक्ष होते. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपींनी यादव यांना बाजारात पळवत, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आता पोलीस घटनास्थळाच्या जवळपास लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे. बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार्रा 2 परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी लवकरच बदमाशांना अटक केल्याचा दावा केला आहे.

मंदिराच्या वादात एकाची हत्या

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही एक हत्या करण्यात आली आहे. इथल्या गोसाईगंज भागात निर्मल अग्निहोत्री नावाच्या व्यक्तीला काहींनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महावीर ट्रस्टच्या जमिनीबाबत इथल्या 2 गटांमध्ये वाद होता. याच जागेवर पेशाने ठेकेदार असलेले निर्मल अग्निहोत्री बांधकाम करत होते. यावरुनच मंदिर पुजारी आणि त्यांचे सहकारी चिडले, आणि त्यांनी अग्निहोत्रीला मारहाण केली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पुजाऱ्यासह त्याचे सहकारी फरार झाले आहेत.

दरम्यान याबाबत डीसीपी गोपाल चौधरींनी माहिती दिली. ते म्हणाले की, गस्तीदरम्यान पोलिसांना एक जखमी अवस्थेतील व्यक्ती सापडला, त्याच्या अंगावर खूप जखमा होत्या. जेव्हा पोलिस त्याला घेऊन रुग्णालयात पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृताच्या पायावर जखमेच्या खुणा आहेत, ज्यामुळे त्याची हत्या झाल्याचे दिसते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण काय आहे हे समजेल. दरम्यान, पोलीस या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा:

बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर मामा भोसलेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, दिलासा नाहीच!

प्रियकरासोबत पतीचा काटा काढला, नंतर पतीला न्याय मिळावण्याचं नाटक करत वर्षभर टीव्ही चॅनलसमोर आक्रोश