रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकून जखमी बाईकस्वाराचा मृत्यू, उपचारादरम्यान अखेरचा श्वास

| Updated on: Nov 29, 2021 | 9:53 AM

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रविकांत तुपकर यांची इनोव्हा गाडी आणि मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाला होता. ही दुचाकी भरधाव वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती.

रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकून जखमी बाईकस्वाराचा मृत्यू, उपचारादरम्यान अखेरचा श्वास
रविकांत तुपकर आणि त्यांची अपघातग्रस्त कार
Follow us on

बुलडाणा : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे’ नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या बाईकस्वार युवकाचा अखेर मृत्यू झाला. बुलडाण्यात झालेल्या अपघातातील जखमी तरुणावर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते. या अपघातात रविकांत तुपकर यांना कुठलीही गंभीर दुखापत झाली नव्हती.

नेमकं काय घडलं होतं?

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रविकांत तुपकर यांची इनोव्हा गाडी आणि मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाला होता. ही दुचाकी भरधाव वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान, दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी तुपकरांच्या गाडीला येऊन धडकली. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील दोघे जण जखमी झाले होते.

दोघेही येवता येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातात रविकांत तुपकर यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले. पण तुपकर आणि त्यांचा ड्रायव्हर यांना दुखापत झाली नव्हती.

तुपकरांची धावाधाव, रुग्णालयात व्यवस्था

यावेळी रविकांत तुपकर यांनी स्वतः धावाधाव करत जखमींना औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. मात्र उपचार सुरु असताना यातील जखमी तरुणाची प्राणज्योत मालवली. तुषार परिहार असे मृत्युमुखी पडलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव आहे. तर दुसरा जखमी गजानन सोळंकी हा उपचार घेऊन घरी परतला.

मुंबईतील बैठकीला जाताना अपघात

मुंबई येथे सोयाबीन- कापुसप्रश्नी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आयोजित असलेल्या बैठकीला जात असताना रविकांत तुपकरांच्या गाडीला 22 नोव्हेंबरच्या रात्री हा अपघात झाला होता. भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी आणि तुपकर यांची इनोव्हा कार समोरासमोर धडकली होती.

संबंधित बातम्या :

Ravikant Tupkar Accident | शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वार येऊन धडकले

Swabhimani Protest | स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण, अज्ञातांकडून बुलडाणा तहसीलदार यांची जीप जाळण्याचा प्रयत्न