बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह घरामागे आढळला, अंगावर हळद-कुंकू, कोल्हापुरात नरबळी?

| Updated on: Oct 05, 2021 | 12:40 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात राहणाऱ्या सात वर्षीय बालकाचा निर्घृण खून करण्यात आला. बालकाच्या मृतदेहाच्या शेजारी गुलाल आणि कुंकू आढळले आहे.

बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह घरामागे आढळला, अंगावर हळद-कुंकू, कोल्हापुरात नरबळी?
कोल्हापुरात चिमुरड्याचा नरबळी दिल्याची शक्यता
Follow us on

कोल्हापूर : सात वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. चिमुकल्याच्या मृतदेहाजवळ गुलाल आणि कुंकू आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात राहणाऱ्या सात वर्षीय बालकाचा निर्घृण खून करण्यात आला. बालकाच्या मृतदेहाच्या शेजारी गुलाल आणि कुंकू आढळले आहे. दोन दिवसांपासून चिमुकला घरातून गायब होता. त्यामुळे पालकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.

घराच्या मागे मृतदेह सापडला

ग्रामस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी बालकाची शोधाशोध सुरु केली होती. त्याचबरोबर शाहूवाडी पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके पाठवली होती, मात्र आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्याच घराच्या पाठीमागे सापडला.

अमावस्याच्या पूर्वसंध्येला प्रकार

बालकाच्या अंगावर गुलाल, हळदी- कुंकू टाकण्यात आलं होतं. अमावस्याच्या पूर्वसंध्येलाच असा प्रकार समोर आल्याने हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मात्र याबाबत कोणतीच अधिकृत स्पष्टता दिलेली नाही. दरम्यान हे कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

अपत्य नसल्याने मित्राच्या मुलाची हत्या

दरम्यान, स्वत:ला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना ऑगस्ट महिन्यात कोल्हापुरातच उघडकीस आली होती. सावर्डे बुद्रुक (ता. कागल) गावातून सात वर्षांच्या बालकाचं अपहरण झालं होतं. याबाबत वडिलांनी मुरगूड पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी आरोपी मारुती वैद्य (वय 45) याची चौकशी केली असता त्याने शेतामध्ये मुलाची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली होती. मुलाचा मृतदेह सावर्डे गावच्या तलावापासून 200 मीटर अंतरावरील शेतामध्ये सापडला होता. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक आणि महिलांनी प्रचंड संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला होता. आरोपीस बारा दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

आजोळला आला असताना संतापजनक प्रकार

चिमुकला आपले आजोळ सावर्डे बुद्रुक येथे घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत आला होता. तो मंगळवारी (17 ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास बेपत्ता झाला होता. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. भर वस्तीत असणाऱ्या गल्लीतून चिमुकला गायब कसा झाला? याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणाहून तो गायब झाल्याने त्याचवेळी हे कृत्य कुणी माहितीतील व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली होती.

संबंधित बातम्या :

मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचं अपहरण, नंतर निर्घृण हत्या, मृतदेह शेतात पुरला, कोल्हापूर हादरलं

दुसरं लग्न केलं, मुलगी झाली, पण पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं

वर्दीला डाग, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जिथे कार्यरत, त्याच पोलीस ठाण्यात बेड्या