Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत

| Updated on: Mar 31, 2022 | 8:48 AM

नागपुरातील हायप्रोफाईल वकील सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बाजू मांडली होती.

Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत
Satish Uke
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नागपूर : नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने धाड (ED Raid) टाकल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळपासूनच उके यांच्या नागुपरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु आहे. मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावेळी उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे. ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे.

काय आहे प्रकरण?

नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकली आहे. पार्वती नगर भागातील निवासस्थानी गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे.

राजकीय वर्तुळातही उठबस

सतीश उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.  तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात त्यांनी केस लढवली आहे. सतीश उके यांची राजकीय वर्तुळातही चर्चा आहे.

फडणवीसांविरोधातील याचिका काय होती?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर 2014 मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप झाला होता. या दोन फौजदारी गुन्ह्यांमध्ये एक अब्रुनुकसानीचा, तर दुसरा फसवणुकीचा खटला होता. फडणवीसांनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणी खुल्या कोर्टात सुनावणी

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू