अंध-मूकबधिर शाळेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, परभणीत तरुणाचा शाळेतच गळफास

परभणीच्या पालम तालुक्यातील शेखराजूर येथील अंध आणि मूकबधिर शाळेवर नोकरीला घेतो, असं आमिष दाखवून फसवल्याने 37 वर्षीय नारायण किशनराव पवार याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली

अंध-मूकबधिर शाळेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, परभणीत तरुणाचा शाळेतच गळफास
प्रातिनिधीक फोटो


प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी : अंध आणि मूकबधिर शाळेत नोकरी देण्याच्या आमिषानंतर फसवणूक झाल्यामुळे होतकरु तरुणाने आत्महत्या केली. 37 वर्षीय नारायण किशनराव पवार याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण?

परभणीच्या पालम तालुक्यातील शेखराजूर येथील अंध आणि मूकबधिर शाळेवर नोकरीला घेतो, असं आमिष दाखवून फसवल्याने 37 वर्षीय नारायण किशनराव पवार याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळेचे संस्थापक विठ्ठल संभाजी गुटे यांच्या नावे चिठ्ठी लिहून शाळेच्या इमारतीतच गळफास घेत त्याने आपल्या जीवनाची अखेर केली.

शाळेच्या संस्थापकाविरोधात गुन्हा

या प्रकरणी मयत तरुणाची पत्नी स्वाती पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पालम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण पवारला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी विठ्ठल संभाजी गुटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करत आहेत.

मंजूर कर्जाची रक्कम न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

दुसरीकडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील तरुणाने आयुष्य संपवलं. तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह बँक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय डवंग असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 20 ऑगस्टला जयने विष प्राशन केले होते, तर 23 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्या प्रकरणी बँक निरीक्षक राजेंद्र बेलेकर आणि शाखा अधिकारी नामदेव खोत यांच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षण नसल्याने जालन्यात तरुणाचा गळफास

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडलीये.

सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो 22 वर्षांचा होता. ‘आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय’, अशी सुसाईड नोट लिहून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला.

सदाशिव हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याने इलेक्ट्रीशियनचा कोर्स केला होता. मात्र मराठा आरक्षण नसल्यानं पाहिजे तशी नोकरी मिळत नव्हती, असा त्याचा आरोप होता. शिवाय शेतात ओला दुष्काळही आहे आणि याच विंवचनेत सदाशिवनं घरातील छताच्या पंख्याला मंगळवारी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

येणोरा गावातील तरुणांची मागणी

आत्महत्या करण्यापूर्वी सदाशिवनं एक सुसाईड नोटही लिहून ठेवली. यामध्ये त्याने ओला दुष्काळ आणि मराठा आरक्षण नसल्याने आत्महत्या करीत आहे, असं स्पष्ट उल्लेख केला आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपले प्राण दिले आहेत. महिना-दोन महिन्यांनी अशी बातमी राज्यातून येताना दिसतात. त्यापेक्षा एकदाच आरक्षणाचा निकाल लावून टाका, अशी मागणी येणोरा गावातील मराठा तरुणांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

‘आरक्षण नाही, जीवनयात्रा संपवतोय’, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या

मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ, कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या

नोकरीच्या शोधात त्याच्या जीवनाचा अंत, डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर रक्तबंबाळ अवस्थेत तरुण, उपचारादरम्यान मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI