
देशभरात अनेक गुन्ह्यांच्या घटना समोर येत असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तर अत्यंत हादरवणारी घटना घडली आहे. तिथे एका मुलीने एका तरूणाचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. मात्र त्या नकारामुळे संतापलेल्या तरूणाने रागाच्या भरात त्या मुलीचं नाकच कापलं. भोपाळच्या गांधीनगर भागात हा धक्कादायक प्रकार घडला. दिनेश असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरूणीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश काही दिवसांपासून पीडित मुलीवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होता, परंतु मुलीने आरोपीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. यामुळे आरोपी संतापला आणि त्याने मुलीवर चाकूने हल्ला केला आणि तिचे नाक कापले. पीडित मुलगी 12 वी पास असून ती गांधीनगरमध्ये रहाते, कुटुंबियांसह तिथे तिचे वास्तव्य आहे.
जबरदस्ती स्कूटरवर बसवलं
आरोपीही पूर्वी गांधी नगरमध्ये राहत होता. आता तो सिहोरमध्ये राहतो. ही घटना गुरुवारी घडली. पीडित मुलीने केलेल्या दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरुवारी दुपारी 12 वाजता भोपाळहून सिहोरला जात होता. तर ती मुलगी गांधी नगर येथील कॉलेजला जात होती. मुलगी विमानतळ पुलावर पोहोचताच, आरोपीने मागून स्कूटीवर येऊन तिला थांबवले. त्यानंतर त्याने पीडितेला जबरदस्तीने त्याच्या स्कूटीवर बसवले आणि बोलण्यासाठी आयटी पार्कमध्ये नेले.
हल्ला करून झाला फरार
तिथे पोहोचल्यावर त्याने स्कूटरच्या डिक्कीतून चाकू काढला आणि त्या तरूणीवर तो लग्नासाठी दबाव टाकू लागला. मात्र पीडितेने त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं तिने त्याला थेट सांगितलं. मात्र तिचं बोलणं, तिचा नकार ऐकून आरोपीला राग आला आणि त्याच रागाच्या भरात त्याने तिच्यावर हल्ला करत तरूणीचे नाक कापले. त्यानंतर आरोपी तरूण घटनास्थळावरून पळून गेला. पीडिता तिथे वेदनेने ओरडत राहिली. तिने कसाबासा तिच्या आईला फोन केला आणि संपूर्ण घटना सांगितली.
मुलीवर हल्ला झाल्याचे ऐकून पीडितेची आई तिच्या भावासह तात्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर पीडित तरूणीला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध घेत आहेत.