
आयुष्य कसं आहे ना, अगदी क्षणभंगुर.. आत्ता हसता खेळता माणूस पुढच्याच क्षणी कोसळू शकतो. गुजराच्या सौराष्ट्रमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तिथे लिव्ह-इन पार्टनर तरूणीची हत्या केल्याचा आरोप एका करूणावर होता, पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र तो तुरूंगात असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, हार्ट अटॅक आल्यानेच त्याचे निधन झाल्याच समजते. अखेर पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नरेंद्र सिंह ध्रुवेल असे मृताचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्रने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. ही घटना सौराष्ट्रातील एका सिरेमिक कारखान्यातील कामगार वसतिगृहात घडली. ते दोघे गेल्या तीन महिन्यांपासून तिथे राहत होते. मात्र एक दिवस त्यांच्यात खूप भांडण झालं, वाद पेटला. त्याच रागाच्या, संतापाच्या भरात नरेंद्रने त्याची प्रेयसी पुष्पा देवी मरावी हिला लाकडी दांडा आणि बेल्टने जबर मारहाण केली. त्यात ती गभीर जखमी झाली, ती नरेंद्रकडे याचना करत राहिली, त्याने थांबावं म्हणून तिने अक्षरश: भीक मागितली, पण नरेंद्रंचं मन काही द्रवलं नाही. तो मरावी हिच्या चेहऱ्यावर चावलाही. अखेर थोड्याच वेळात त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला.
या भयानक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. महिलेचा मृत्यू गंभीर दुखापती आणि शारीरिक वेदनांमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी ध्रुवेलला अटक केली, तेव्हा त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले.
मात्र रविवारी पहाटे 4 च्या सुमारास नरेंद्रच्या छातीत खूप वेदना होऊ लागल्या, पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. अखेर नरेंद्रच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. एका दिवसापूर्वी ज्याने आपल्या गर्लफ्रेंडला मारल, त्याचाच दुसऱ्या दिवशी तडकाफडकी मृत्यू झाल्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
अनूपपूरला रहायची पुष्पा देवी
मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील रहिवासी २५ वर्षीय नरेंद्र सिंह मोरबीमधील लखदीरपूर गावाजवळील लेक्सस सिरेमिकमध्ये कामगार म्हणून काम करत होता, असं पोलिसांनी सांगितलं. मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील 20 वर्षांच्या पुष्पा देवी हिच्या तो प्रेमात पडला आणि ते दोघे एकत्र मोरबीला गेले. ते गेल्या तीन महिन्यांपासून एकत्र राहत होते. दोघेही लेक्सस सिरेमिक्समध्ये कामगार म्हणून काम करत होते. पण एमपीवरून परत आल्यापासूनच त्यांच्यात भांडणं सुरू होती.
जखमी गर्लफ्रेंडला सोडून काढला पळ
शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला, त्यादरम्यान नरेंद्रने पुष्पा देवी हिला बेदम मारहाण केली. या घटनेत पुष्पा गंभीर जखमी झाली. मात्र नरेंद्र तिला तिथेच सोडून पळून गेला. तिची हालत अतिशय गंभीर झाली, बेशुद्ध पडली आणि थोड्यावेळाने पुष्पा हिचा मृत्यू झाला. नंतर नरेंद्र परत आला, त्याने पुष्पाला जमीनीवर पडलेलं पाहिलं, त्याने तिला उठवायचा प्रयत्नही केला, पण काहीच उपयोग झाला नाही, तोपर्यंत पुष्पाचा जीव गेला होता. त्याने कंपनीचा सुपरवायझर आणि क्वार्टरमास्टर यांना बोलावलं. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पुष्पाचा मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी नरेंद्रला अटक केली, पण दुसऱ्याच दिवशी त्याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला.