रस्ता अपघातात त्याने बायको गमावली, बाईकवरून नेला मृतदेह; अखेर ‘AI’ च्या मदतीने आरोपीला अटक

नागपूरमधील एका हृदयद्रावक घटनेत, हायवेवर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा पती बाईकवरूनच तिचा मृतदेह कसाबसा घेऊन गेला होता, त्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. आता याप्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 'AI' च्या मदतीने अवघ्या 15 मिनिटांत त्यांनी आरोपी शोधला आणि..

रस्ता अपघातात त्याने बायको गमावली, बाईकवरून नेला मृतदेह; अखेर AI च्या मदतीने आरोपीला अटक
| Updated on: Aug 18, 2025 | 1:26 PM

गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला होता. गेल्या रविवारी दुपारी नागपुर-जबलपुर नॅशनल हायवेवर एक भयानक अपघातझाला. ट्रक चालकाने धडक दिल्यामुळे एक महिला बाईकवरून कोसळली आणि ट्रकखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या पतीन रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांकडे मदत मागितली पण कोणीच त्याच्या मदतीसाठी थांबलं नाही. अखेर त्या पतीने निराश होऊ पत्नीचा मृतदेह बाईकच्या मागे बांधला आणि तो तसाच मध्यप्रदेशमधील त्याच्या गावी निघाला. या व्हिडीओमुळे अनेक लोकं हळहळले.

आता याच अपघाताप्रकरणी एक नवी अपडेट समोर आली आहे. ज्या ट्रक ड्रायव्हरमुळे हा अपघात झाला, त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. ‘एआय’च्या मदतीने पोलिसांनी 15 मिनिटांत आरोपी शोधला. ‘हिट ॲंड रन’प्रकरणात राज्यातील हे पहिलं डिटेक्शन असून आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी 700 किमी अंतरावर जाऊन त्याला बेड्या ठोकल्या.

मन सुन्न करणारी घटना! बायको रस्त्यावरच मरून पडली… मदतीसाठी प्रत्येक गाडीसमोर तो ढसाढसा रडला, अखेर बाईकवरच मृतदेह बांधला अन्…

एरवी ज्या तपासाला आठवडा लागत होता, ते काम अवघ्या 15 मिनिटांत झालं असून नागपूर जिल्ह्यातील देवलापार अपघात प्रकरणात ‘एआय’च्या मदतीनं 700 किलोमीटर दूर दोषी ट्रकचालकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेतील ‘MARVEL’ टूल वापरुन दोषी ट्रकचालकाला बेड्या ठोकल्या. सत्यपाल राजेंद्र असे ट्रकचालकाचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील महोई येथून ताब्यात घेण्यात आलं .

नेमकं काय झालं ?

9 ऑगस्ट रोजी अमित यादव हे त्यांच्या पत्नी ग्यारसीसोबत नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात त्यांची पत्नी ग्यारसी रस्त्यावर पडली आणि ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. यानंतर तिचा पती, बाईकचालक अमितने रस्त्याने जाणाऱ्या अनेक लोकांकडे मदतीसाठी याचना केली, पण कोणीही थांबले नाही.
यानंतर, अमितला त्याच्या पत्नीचा मृतदेह त्याच्या दुचाकीला बांधण्यास भाग पडलं आणि तो तसाच घरी निघून गेला. यादरम्यान, कोणीतरी एक व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

या घटनेनंतर देवलापार पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे तो ट्रक आणि त्याच्या चालकाची ओळख पटवणे. सुरुवातीला कोणताही सुगावा लागला नाही, परंतु पोलिसांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली. पोलिसांनी महाराष्ट्र ॲडव्हान्स्ड रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एन्हांस्ड लॉ एन्फोर्समेंट (AI-MARVEL) प्रणालीच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. या उच्च तंत्रज्ञानाच्या एआय तंत्रज्ञानामुळे पोलिसांना मोठे यश मिळाले. फुटेजवरून आरोपी ट्रक चालकाची ओळख सत्यपाल राजेंद्र अशी पटली. पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी ट्रक जप्त केला आणि आरोपीला अटक केली.