मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण; रोचकरी बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी, देवानंद रोचकरींवर 35 गंभीर गुन्हे नोंद

| Updated on: Aug 19, 2021 | 10:40 PM

रोचकरी यांना या प्रकरणात कागदपत्रे, शिक्के तयार करण्यासाठी कोणाची मदत घेतली व कुठे तयार केले? कट कोणी-कोणी, कसा आणि कुठे रचला व पूर्णत्वास नेला? यासह इतर तांत्रिक मुद्यांचा तपास व कागदपत्रे हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली होती. ती मान्य करीत 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण; रोचकरी बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी, देवानंद रोचकरींवर 35 गंभीर गुन्हे नोंद
मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणात देवानंद रोचकरी यांना अटक
Follow us on

उस्मानाबाद : मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना अटक करण्यात आली आहे. रोचकरी बंधुंना तुळजापूर तालुका न्यायालयाने 23 ऑगस्टपर्यंत अर्थात पोलीस कोठडी सुनावली आहे. तिर्थकुंड हडप प्रकरणात संशयास्पद आणि बोगस कागदपत्रे तयार करण्याच्या कटात कोण-कोण सहभागी आहे? कागदपत्रे तयार करण्यास कोणत्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मदत केली? रोचकरी यांनी अशाप्रकारे इतर कोणती शासकीय आणि खासगी मालमत्ता हडप केली आहे का? मंकावती कुंडचे मूळ कागदपत्रं आणि इतर तपास करण्यासाठी तुळजापूर पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. (Devanand Rochkari and Balasaheb Rochkari remanded in police custody for 5 days)

रोचकरी यांना या प्रकरणात कागदपत्रे, शिक्के तयार करण्यासाठी कोणाची मदत घेतली व कुठे तयार केले? कट कोणी-कोणी, कसा आणि कुठे रचला व पूर्णत्वास नेला? यासह इतर तांत्रिक मुद्यांचा तपास व कागदपत्रे हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली होती. ती मान्य करीत 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. भूमी अभिलेख व नगर परिषद कार्यलयातील कागदपत्रे यात महत्वाची ठरणार आहेत.रोचकरी यांना 5 दिवसांची कोठडी मिळाली असली तरी त्यातील 3 दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने कार्यालये बंद असणार आहेत. त्यामुळे कमी वेळेत तपास करणे आणि कागदपत्रे हस्तगत करणे पोलिसांसाठी कसरत ठरणार आहे.

तुळजापूर नगर परिषदेचं सहकार्य नाही?

पोलीस प्रशासन मंकावती तिर्थकुंड प्रकरणात तपास करीत असले तरी त्यांना तुळजापूर नगर परिषद प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या तिर्थकुंडाची अनेक कागदपत्रे ही नगर परिषदेच्या ताब्यात आहेत ती दिली जात नाहीत. तसेच देवानंद रोचकरी यांनी जात प्रमाणपत्रसह अन्य शासकीय कामात वापरलेल्या वंशावळ ही कागदपत्रे महत्वाची आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार नगर परिषदेच्या वतीने तक्रार दिलेल्या तक्रारदाराचा मोबाईल गेली 2 दिवस बंद आहे. तो तक्रारदार पोलिसांच्या संपर्कात नाही, किंबहुना टाळाटाळ केली जात आहे. याचवेळी नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे यांची बदली झाली असून पद रिक्त आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर या प्रकरणात गंभीरपणे काम करीत असले तरी खालची यंत्रणा मात्र चालढकल करण्यात मग्न आहे. जिल्हाधिकारी यांनी 4 मुद्यावर कारवाईचे लेखी आदेश दिल्यावर 3 दिवस काहीच हालचाल न केल्याने रोचकरी यांनी नगर विकास मंत्री यांच्याकडून स्थगिती आणण्यात यश मिळाले होते. स्थगिती नंतर रोचकरी यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची खिल्ली उडवली होती, यामुळे प्रशासनाची मोठी नाचक्की झाली होती,आताही तोच कित्ता गिरविला जात आहे. तुळजापूर नगर परिषदमधील काही जण रोचकरी यांना अंतर्गत मदत करून वेळ टाळण्यासाठी आटोकात प्रयत्न करीत आहे, असा आरोप तक्रारदार करीत आहेत.

कागदपत्रे पोलिसांच्या हाती सापडू नये यासाठी प्रयत्न!

तुळजापूर नगर परिषदने सरकारी निधीतून मंकावती तिर्थकुंड साफ स्वच्छता करण्यासाठी 1997 वर्षीच्या आसपास लाखोंचा निधी मंजूर करीत ते काम पूर्ण केले होते. तसेच नगर परिषदेने या कुंडात भाविकांना स्नान करण्यासाठी लिलाव करून 5 पैसे प्रति भाविक कर वसूल केल्याच्या नोंदी नगर परिषदेच्या ताब्यात आहेत. मात्र हे कागदपत्रे पोलिसांच्या हाती सापडू नये यासाठी आटोकात प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छता टेंडर, लिलाव या कामाची निविदा व संचिका दिली जात नाही, यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली असल्याचा आरोप तक्रारदार ऍड जनक कदम व भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमर राजे कदम परमेश्वर यांनी केला आहे.

रोचकरी यांच्यावर तब्बल 35 गुन्हे नोंद

देवानंद रोचकरी यांच्यावर आजपर्यंत 35 गुन्हे नोंद असल्याची बाब तुळजापूर पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यात सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे, नागरिक व शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे धमकावणे याचा समावेश आहे. रोचकरी याच्यावर यापूर्वी 2 वेळेस हद्दपारची कारवाई करण्यात आली होती. तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी कार्यलयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांना उस्मानाबाद कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला होता, त्या प्रकरणात रोचकरी हे जामीनावर आहेत. या सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बाबी पोलिसांनी कोर्टात मांडल्या आहेत. रोचकरी यांच्यावर तब्बल 35 गुन्हे नोंद आहेत.

देवानंद रोचकरींना मंत्रालयातून अटक

देवानंद रोचकरी यांना मुंबई येथील मंत्रालय येथून अटक केल्यानंतर यातील दुसरे आरोपी बाळासाहेब रोचकरी हे तुळजापूर पोलीस ठाण्यात रात्री 3 च्या सुमारास हजर झाल्याने त्यांना अटक करत दोन्ही रोचकरी बंधूंना तुळजापूर येथील तालुका कोर्टात हजर केले गेले. बनावट कागदपत्रे तयार करण्यात व कटात तुळजापूर नगर परिषद, भूमी अभिलेख कार्यालयासह अन्य कोण कोण अधिकारी व कर्मचारी सहभागी होते हे पोलीस तपासात बाहेर येते का हे पाहावे लागेल त्यावरून पुढील दिशा ठरणार आहे. देवानंद रोचकरी यांच्यासह इतरांवर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद आहे.

फरार रोचकरी हे मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने तुळजापूर पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने रातोरात मुंबई येथे जाऊन रोचकरी यांना अटक केली आहे. तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहूल रोटे,पोलीस हवालदार अजय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.गुन्हा नोंद झाल्यावर पुढील कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी रोचकरी यांनी पुन्हा एकदा दिलासा मिळेल या आत्मविश्वासाने व आशेपोटी मंत्रालय गाठले होते मात्र तिथेच त्यांना उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली.

इतर बातम्या : 

केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेत छोट्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचं आवाहन

स्मृतीस्थळ शुद्धीकरणाचा वाद पेटला, भाजप नेते म्हणतात, शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज, का?

Devanand Rochkari and Balasaheb Rochkari remanded in police custody for 5 days