मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण, फरार आरोपी देवानंद रोचकरी अखेर मंत्रालयाजवळ सापडला

मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांच्या आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचा आणि वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे करण्यात आला होता. तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी, अशी मागणी रोचकरी यांनी केली होती.

मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण, फरार आरोपी देवानंद रोचकरी अखेर मंत्रालयाजवळ सापडला
देवानंद रोचकरी
संतोष जाधव

| Edited By: अनिश बेंद्रे

Aug 18, 2021 | 12:27 PM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी फरार आरोपी देवानंद रोचकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गेल्या 8 दिवसांपासून फरार असलेल्या रोचकरी यांना मुंबईतील मंत्रालय भागातून अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद पोलिसांनी मुंबईला जाऊन रोचकरींना बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी दिली. देवानंद रोचकरी यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

मंकावती तीर्थकुंड हडप केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेल्या आदेशाला नगर विकास मंत्र्यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला स्थगिती दिली होती. त्यानंतर देवानंद रोचकरी यांच्या फोटो-व्हिडीओसह त्यांच्या समर्थकांनी “तालुक्याचा 7/12 तुमच्या आईबापाच्या नावावर आहे का? मग कोणाच्या आईबापाच्या नावावर आहे, तेवढं सांगा म्हणजे 7/12 रिकामा करुन घेतो आम्ही” अशा आशयाचे फिल्मी डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

तुळजापूर पोलिसात गुन्हा

मंकावती तीर्थकुंड स्वतःच्या नावावर करुन हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468,469,471 व 34 अंतर्गत देवानंद साहेबराव रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरोधात 11 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांच्या आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचा आणि वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे करण्यात आला होता. तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी, अशी मागणी रोचकरी यांनी केली होती. मंकावती कुंडावर अनेक ठिकाणी विनापरवाना अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसते.

मंकावती कुंडाची महती

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण, तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. गरीबनाथ दशावतार मठाचे महंत सावजी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे 21 रोजी लेखी तक्रार करून तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते.

मंकावती तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी व स्वतः जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन अहवाल दिला होता. तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपवले होते. त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे. मंकावती कुंडाच्या बनावट कागदपत्रे आणि पुरावे तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे आदेश होते, मात्र या आदेशांना स्थगिती मिळाली होती.

देवानंद रोचकरी यांचा भाजप पक्षासाठी संबंध नाही

देवानंद रोचकरी हे भाजपचे स्थानिक नेते म्हणून ओळखले जातात मात्र तुळजाभवानी देवीचे मंकावती तिर्थकुंड हडप केल्याच्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपची मोठी नाचक्की झाली होती. देवानंद रोचकरी यांचा भाजप पक्षाशी दुरानव्ये संबंध नसल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली होती. रोचकरी हे भाजप पक्षाच्या कोणत्याही पदावर पदाधिकारी म्हणून कार्यरत किंवा सक्रीय नसून ते पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत त्यामुळे त्यांचा भाजपशी थेट संबंध राहिलेला नाही, असं काळेंनी स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातम्या :

तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंडच हडप केलं, स्थानिक भाजप नेत्याचा प्रताप

“बाप म्हणतात तुळजापूरचा” मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणात आदेशाला स्थगिती, देवानंद रोचकरी समर्थकांचा जल्लोष

वडिलोपार्जित मालकी असल्याचा दावा करत मंकावती तिर्थकुंड हडपण्याचा डाव, अखेर देवानंद रोचकरी बंधुवर गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें