
पावसाळा सुरू होताच अनेकांना निसर्गाचा आंद लुटण्यासाठी फिरायला जायची, पिकनकची इच्छा होते. मात्र उत्साहाच्या भरात अशाच ठिकाणी काही दुर्घटना होऊ शकते, कधीतरी तर जीवावरही बेतू शकतं. असाच काहीस प्रकार महाराष्ट्रात 2 ठिकाणी घडा आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगरात एकाचा बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मुंबईत पोलिसांनी वाचवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जर तु्म्ही देखील फिरायला जायचा प्लान आखत असाल तर जपून जा आणि मुख्य म्हणजे स्वतःला आवरा..
मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणाचा जोगेश्वरी धबधब्यात बुडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर शहरातून म्हैसमाळ व वेरूळ येथे मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा जोगेश्वरी धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. हर्षदीप नाथा तांगडे असे मृत तरुणाचे नाव असून तो 21 वर्षांचा होता. तो छत्रपती संभाजीनगर येथील नागसेननगर, उस्मानपुरा येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टी असल्याने हर्षदीप हा त्याच्या 13 मित्रांसोबत म्हैसमाळ, वेरूळला फिरण्यासाठी गेला होता. म्हैसमाळनंतर सर्व मित्र वेरूळ लेणी धबधब्याच्या वर असलेल्या डोंगरातील येळगंगा नदीवरील जोगेश्वरी कुंडाकडे गेले. त्या ठिकाणी मोठमोठी खोल कुंडे आहेत. तेवढ्यात हर्षदीपचा भाऊ बुडाला, त्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. अखेर पाण्यात बुडत असलेल्या भावाला वाचवण्यात यश आले, पण स्वतः हर्षदीपच बुडाला कारण त्यालाही पोहता येत नव्हते. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा करून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, हर्षदीपचा बुडून दुर्दैवी अंत झाला.
खोल समुद्रात व्यक्तीने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न
तर दुसऱ्या घटनेत मुंबईतील कफ परेड येथील गीता नगरजवळील खोल समुद्रात एका व्यक्तीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. मात्र कर्तव्यावर असलेले अधिकारी पी.सी. रंधवे यांनी तातडीने कारवाई केली. स्थानिक मासेमारी बोटीच्या मदतीने त्यांनी समुद्रात प्रवेश केला आणि त्या व्यक्तीला यशस्वीरित्या वाचवले.
गीता नगर कफ परेड जवळील समुद्रात एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी समुद्रात फार आतमध्ये गेला होता. याची माहिती कफ परेड पोलीस मोबाईल व्हॅन क्रमांक – 1 ला मिळाली होती. पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर ड्युटीवर तैनात पोलिस अधिकाऱ्याने त्वरित कारवाई केली. अधिकारी पी.सी. रंधवे यांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार बोटीच्या मदतीने ते समुद्राच्या आत गेले आणि जीव देण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला त्यांनी वाचवलं, सुखरूप बाहेर आणलं. त्यामुळे सदर व्यक्तीचा जीव वाचला. ती व्यक्ती कोण आहे? तो समुद्रात जाऊन आत्महत्या करत होता ? या बाबत सध्या चौकशी सुरू आहे.