शुद्ध पाणी विकण्याचा दावा करणाऱ्या बड्या कंपनीवर कारवाई! या कंपनीचे बिस्लेरीशीही संबंध?

| Updated on: Oct 13, 2022 | 1:24 PM

दिवाळीआधी ब्युरो ऑफ इंडिया स्टॅन्डर्डची मुंबईत मोठी कारवाई! शुद्ध पाण्याच्या नावाखाली नेमकं काय दिलं?

शुद्ध पाणी विकण्याचा दावा करणाऱ्या बड्या कंपनीवर कारवाई! या कंपनीचे बिस्लेरीशीही संबंध?
वॉटर प्लांटवर कारवाई
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

दिनेश त्रिपाठी, TV9 मराठी, मुंबई : मुंबईमध्ये अनेकजण शुद्ध पाण्यासाठी पॅक्ड वॉटर बॉटलचा (Packed Water Bottle) पर्याय अवलंबतात. पण नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे बाटलीबंद पाणी खरंच चांगलं आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबईच्या माहुल परिसरात बीआयएसने (BIS) एका वॉटर प्लांटच्या विरोधात कारवाई केली. ज्या कंपनीचा हा वॉटर प्लांट
(Water Plant) होता, ती कंपनी एका बड्या मिनरल वॉटर कंपनीची फेंचाईजी देखील आहे, अशी माहिती समोर आलीय.

नेमकी कुठे कारवाई?

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बीआयएस म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्डकडून भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर  माहुलमध्ये प्रतिमा फुड एन्ड बेवरेजेसच्या वॉटर प्लांटवर कारवाई करण्यात आली. हा प्लांट नेस्तनाबूत करण्यात आलाय.

या वॉटर प्लांटमध्ये तयार केल्या जाणाऱ्या शुद्ध पाण्याच्या बाटल्यांच्या नावाखाली भेसळ सुरु होती, असं तपासातून समोर आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बीआयएसच्या अधिकाऱ्यांना प्रतिमा फूट एन्ड बेवरेजेस या कंपनीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

कमी दर्जाचं पिण्याचं पाणी बाटलीतून विकलं जात असल्याची गुप्त माहिती सूत्रांनी बीआयएसच्या पथकाला दिली होती. त्यामुळे ही कंपनी बीएसआयच्या रडारवर आली होती.

‘ते बाटलीबंद पिण्यासाठी अयोग्य’

नुकतेच या वॉटर प्लांटमधील पाण्याचे काही नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्या चाचणीत हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. त्यानंतर बीआयएसने या वॉटर प्लांटमधील काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले होते.

पण या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. या वॉटर प्लांटमध्ये काम सुरुच असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. रात्रीच्या अंधाराचा फायदा उचलून या वॉटर प्लांटमधून शुद्ध पाण्याच्या नावाखाली भेसळयुक्त पाणी बाटलीत भरलं जात होतं.

त्यानंतर या बाटलीबंद पाण्याची विक्री करुन गोरखधंदा सुरु असल्याचं निदर्शनास आलंय. या संपूर्ण प्रकरणी बिस्लेरी कंपनीच्या काही बड्या अधिकाऱ्यांचाही हात आहे का? असा संशय व्यक्त केला जातोय.

प्रतिमा फुड एन्ड बेवरेजेस ही कंपनी बिस्लेरी या प्रसिद्ध कंपनीची फ्रेंचायची असल्याचंही समोर आलंय. दरम्यान, या कारवाईनंतर कंपनीचं म्हणणं अद्याप समोर येऊ शकलेलं नाही.

या कारवाईवर कंपनीकडून नेमकं आता काय स्पष्टीकरण दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या कारवाईमुळे प्रतिमा फुड एन्ड बेवरेजेस कंपनीचं नाव तर खराब झालं आहेत. पण आता बिस्लेरी कंपनीवरही संशयानं पाहिलं जातंय.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तेल, दूध, मावा, पनीर या सगळ्यांबाबत अनेकदा एफडीएकडून भेसळ केल्याप्रकरणी कारवाई केली जाते. पण आता चक्क पाण्यातच भेसळ होत असल्याचं समोर आल्यानं शुद्ध पाण्यासाठी बाटली विकत घेऊन पाणी पिणाऱ्यांच्या सुरक्षेवरही शंका घेतली जातेय.