चर्चगेट वसतिगृह हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे, अनेक मुली ‘त्याच्या’ संपर्कात होत्या

| Updated on: Jun 08, 2023 | 8:31 PM

चर्चगेट महिला वसतिगृह येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणात नवे खुलासे आता समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून जलद गतीने तपास सुरु आहे. पोलिसांनी आज हॉस्टेलमधील सात ते आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांना आजच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चर्चगेट वसतिगृह हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे, अनेक मुली त्याच्या संपर्कात होत्या
Follow us on

मुंबई : चर्चगेट वसतिगृहातील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. आरोपी ओमप्रकाश कनोजिया पाण्याच्या पाईपलाईनच्या मदतीने पहिल्या मजल्यावर चढला होता. वसतिगृहाचे गेट बंद झाल्याने आरोपी पाण्याच्या पाईपलाईनच्या मदतीने पहिल्या मजल्यावर चढला होता. पहिल्या मजल्यावरून आरोपी पायऱ्यांवरून चौथ्या मजल्यावर गेला, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी वसतीगृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने वसतिगृहाच्या वॉर्डन मॅडमला आरोपीची तक्रार केली होती. पण त्यांनी लक्ष दिलं नाही, असा आरोप पीडितेच्या आई-वडिलांनी केलाय. तसेच पीडित मुलीला वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर एकटीला का ठेवलं? असा सवाल पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलाय. पोलीस या आरोपांच्या अनुषंगाने तपास करणार आहे.

आतापर्यंत पोलिसांनी वसतिगृहातील 7 ते 8 जणांचे जबाब नोंदवले आहेत. पीडिता राहत होती त्या चौथ्या मजल्यावर सीसीटीव्ही आहे. मात्र तो कार्यान्वित नव्हता, अशीदेखील माहिती समोर आलीय. वसतिगृहातील कित्येक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

आरोपीने दुष्कृत्यानंतर खोलीला बाहेरुन कुलूप लावले, नंतर…

आरोपीने रात्री साडेअकरा ते पहाटे साडेचार दरम्यान हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. पावणेपाचच्या दरम्यान आरोपी वसतिगृहाच्या गेटमधून बाहेर पडला आणि पुढच्या 10 ते 12 मिनिटात त्याने रेल्वे ट्रॅकवर झोपून आत्महत्या केली. आरोपीने पीडितेचा मृतदेह असलेल्या खोलीला बाहेरून कुलूप लावून चावी स्वतःच्या खिशात ठेवूनच आत्महत्या केली होती. पोलिसांना ही चावी आरोपीच्या खिशात सापडली आहे.

हे सुद्धा वाचा

हॉस्टेलमधील अन्य मुलीही आरोपीच्या संपर्कात

हॉस्टेलमधील अन्य मुलीही आरोपीच्या संपर्कात होत्या. त्याला छोट्या-मोठ्या गोष्टी आणण्यासाठी फोन करायच्या, असं चौकशीत समोर आलंय. आरोपी ओमप्रकाश कनोजिया हा तिथल्या अधिकृत स्टाफवर नियुक्त नव्हता. मात्र वसतिगृहात इस्त्री करून देण्याचंही काम करायचा, अशी देखील माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे.

शोकाकूल वातावरणात पीडितेला आज अखेरचा निरोप

दरम्यान, संबंधित घटनेमुळे पीडितेच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पीडितेचे आई-वडील वसतिगृह प्रशासनावर संतापले आहेत. त्यांनी या प्रकरणात सहआरोपी म्हणून वसतिगृहाच्या दोन्ही वॉर्डन महिला अधिकाऱ्यांची नावे घ्यावी, अशी मागणी केली आहे. आपल्याला या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या मुलीचा मृतदेह घेणार नाही, असा पवित्रा पीडितेच्या आई-वडिलांनी घेतला होता.

पोलिसांनी या प्रकरणी पीडितेच्या आई-वडिलांच्या आरोपांनुसार चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर पीडितेच्या पार्थिवावर आज अंत्य संस्कार करण्यात आले. पीडित मुलीचा मृतदेह तिच्या पालकांकडून संध्याकाळी जे जे रुग्णालयातून स्वीकारण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिकेने पीडितेचे पार्थिव दादर स्मशानभूमीत आणण्यात आलं. यावेळी अत्यंत शोकाकूल वातावरणात पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आणि मित्रमंडळींनी तिला अखेरचा निरोप दिला.