‘आरोपी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर…’; अक्षय शिंदे याच्या वकिलांचा मोठा इशारा
मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूरच्या नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी पाच पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. अक्षय शिंदेच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि आता एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, पोलिसांनी खोटे पुरावे सादर केले आणि अक्षय शिंदेचा राजकीय बळी होता. न्यायालयाने पोलिसांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असं अक्षय शिंदेच्या वकिलांनी सांगितलं

बदलापुरातील एका नामांकीत शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. त्यामुळे पोलिसांसाठी हा मोठा धक्का आहे. अक्षय शिंदे याचे वकील अमित कटारनवरे यांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “मर्डर केसची पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. आमची मदत केल्याबद्दल उच्च न्यायालय आणि न्यायदंडाधिकारी यांचे धन्यवाद देतो. ठाण्याचे न्यायदंडाधिकारी यांनी काय आपल्या अहवालात सांगितलंय, ते सांगतो. अक्षय शिंदेने अधिकाऱ्यांवर फायरींग केली हे सांगितलं. मात्र गनशॉट रेसिड्यू दिसले नाही. पिस्टलवर देखील त्याचे ठसे नाहीत. बॉटलनं पाणी पिला त्यावर देखील त्याचे ठसे नाहीत. मांडीत गोळी मारली अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात जिन्सवर देखील रेसिड्यू नाहीत”, असं वकील अमित कटारनवरे म्हणाले.
“माध्यमांसमोर वेगळं सांगितलं आणि अधिकारी कोर्टासमोर वेगळे बोलले. अक्षयच्या गुडघ्यांवर देखील जखमा आहेत. सीन रिक्रिएशनमध्ये निर्दशनास येत आहे की ४ अधिकारी यासंदर्भात इनफ होते. हा खून आहे, या संदर्भात अहवाल देखील दुजोरा देतोय. अक्षयचे आई वडील हे जे बोललेत ते सत्य आहेत. अक्षय शिंदेंच्या मृत्यूस ५ पोलीस कारणीभूत आहेत, असं ठाण्याच्या न्यायदंडाधिकारी यांनी अहवालात सांगितले आहे”, अशी माहिती अमित कटारनवरे यांनी दिली.
‘आरोपी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर…’
“या प्रकरणी एफआयआर यांच्यावर आता दाखल होईल. ५ अधिकाऱ्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते दाखल करतील किंवा नाही, आम्ही मुंब्रा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा म्हणून तिथे जाऊन विनंती करु. आरोपी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत”, अशी भूमिका अक्षयच्या वकिलांनी मांडली.
‘कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले’
“जे रिपोर्ट पाहिले ते पाहिल्यावर सरकारकडून केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा बनाव होता. ते खोटं ठरलं आहे. पोलिसांवर तात्काळ एफआयआर दाखल करणं क्रमप्राप्त आहे. कस्टोडिअल केसची चौकशी व्हायला इतका का वेळ लागला? कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत”, असं अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांनी सांगितलं.
“बऱ्यापैकी निकाल आला. त्याचे आम्ही स्वागत करतो. कोर्ट ऑर्डर पास तेव्हाच करेल जेव्हा सरकार कारवाई करणार नाही. जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही पुन्हा कोर्टाकडे येऊ ना. तांत्रिक पुराव्यांवर अधिक भर दिलाय, माणूस खोटं बोलू शकतो. मात्र पुरावे बोलणार नाहीत”, असं अमित कटारनवरे म्हणाले.
‘अक्षय शिंदे हा राजकीय बळी होता’
“पोलिसांचा अनुभव आहे, ते राजकीय मदत असल्याशिवाय करणार नाहीत. २०२१ ला बलात्काराच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला चौकशीसाठी बाहेर काढलं. अक्षयविरोधात रोष होता आणि राजकारण्यांनी त्याचा फायदा घेण्यासाठी हे कृत्य केलं. अक्षय शिंदेंसंदर्भात आयोग स्थापन केला आहे. अनेक अहवाल सरकारने मान्य केले नाहीत. अक्षय शिंदे हा राजकीय बळी होता, राजकीय फायदा यात झाला आहे. मस्साजोगच्या सरपंचाच्या प्रकरणी देखील हेच केलंय. गृहविभाग देवाभाऊकडे होता, बदल्याचे ऐवजी बदलाचे राजकारण महत्त्वाचे आहे”, असं अक्षय शिंदे याचे वकील अमित कटारनवरे म्हणाले.