खेळता-खेळता रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडले, मुंबईत दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू

| Updated on: Oct 26, 2021 | 8:00 AM

दोन्ही मुलं अँटॉप हिल परिसरातील मैदानात खेळत होती. यावेळी येथील पाईपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये भरलेल्या पाण्यात दोन्ही मुलं अचानक पडली होती.

खेळता-खेळता रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडले, मुंबईत दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू
अँटॉप हिलमध्ये खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू
Follow us on

मुंबई : मुंबईच्या अँटॉप हिल भागात खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. पाईपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे दोघा मुलांना प्राण गमवावे लागले.

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या अँटॉप हिल भागात सीजीएस कॉलनी सेक्टर 7 मध्ये दोन मुलांचा खड्ड्यात बुडून अपघाती मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी दोन्ही मुलं तिथल्या मैदानात खेळत होती. यावेळी येथील पाईपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये भरलेल्या पाण्यात दोन्ही मुलं अचानक पडली होती.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू

मुलं खड्ड्यातील पाण्यात पडल्याचा प्रकार लक्षात येताच दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जवळच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉक्टरानी दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले. यापैकी एक जण नऊ वर्षांचा, तर दुसरा अकरा वर्षांचा होता.

सुरक्षिततेच्या उपाय योजना न केल्याचा आरोप

पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना सुरक्षिततेच्या योग्य त्या उपाययोजना केलेल्या नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटने संदर्भात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून योग्य ती कायदेशीर कारवाई सुरु आहे.

धबधब्याच्या पाण्यात बुडून जळगावात दोघांचा मृत्यू

दुसरीकडे, वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील बसाली वॉटरफॉल या पर्यटनस्थळी काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत मृत्यू पावलेले दोन्ही तरुण हे जळगावातील रहिवासी होते.

उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय 24, रा. खेडी, ता. जळगाव) आणि जयेश रवींद्र माळी (वय 25, रा. वाघनगर, जळगाव) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. उज्ज्वल पाटील या तरुणाचा वाढदिवस होता. मात्र दुर्दैवाने वाढदिवशीच त्याला प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे जळगाव शहरावर एकच शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या :

नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्दैवी अंत

नदीत पोहण्याचा मोह जीवावर, यवतमाळचे पाच जण नागपुरात बुडाले

बैल धुण्यासाठी मित्रांसोबत गेला, घरी परतलाच नाही, बुलडाण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू