नेव्हीतील पतीविरोधात पोलिसात तक्रार, 24 तासात पत्नीची ‘आत्महत्या’, वडील म्हणतात, तिच्या मानेवर पाय ठेवून…

| Updated on: Oct 22, 2021 | 1:51 PM

“माझ्या मुलीने मला सांगितले की तिच्या पतीने तिला अमानुष पद्धतीने मारहाण केली, आणि एकदा तिच्या मानेवर पाय ठेवला. तिने मला विनंती केली की तुम्ही मुंबईला या आणि मला पश्चिम बंगालला घेऊन जा. 10 ऑक्टोबरलाही तिने मला रात्री फोन केला आणि मदतीसाठी रडत होती, ” असं पूजाचे वडील म्हणाले.

नेव्हीतील पतीविरोधात पोलिसात तक्रार, 24 तासात पत्नीची आत्महत्या, वडील म्हणतात, तिच्या मानेवर पाय ठेवून...
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली भारतीय नौदलातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. आत्महत्येच्या 24 तास आधी, 11 ऑक्टोबर रोजी विवाहितेने पती आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार मुंबईतील कफ परेड पोलिसांकडे दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीसह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला असून त्यांना पश्चिम बंगालमधील त्यांच्या गावातून मुंबईला आणलं जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

23 वर्षीय पूजा चाकी या विवाहित महिलेने 11 ऑक्टोबर रोजी मुंबईतील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पूजाच्या वडिलांनी तिचा पती कल्याण चाकी (31 वर्ष) आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार नोंदवली आहे. पूजाचे वडील डॉ. तपन मंडल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पूजाने 25 नोव्हेंबर 2020 रोजी पश्चिम बंगालमध्ये कल्याणशी लग्न केले. जानेवारी 2021 मध्ये डॉ. मंडल यांना समजले की तिच्या मुलीला जावई आणि सासरची मंडळी त्रास देत आहेत.

माहेरुन पूजाला परत सासरी नेले

मार्चमध्ये पूजाला तिचा पती आणि सासरच्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली. डॉ मंडल त्यावेळी तिच्या गावी सिलिंडा येथे गेले आणि तिला चकदहा येथील घरी घेऊन आले. मात्र काही दिवसांनी कल्याण पूजालावमुंबईतील नेव्ही नगरमधील सरकारी निवासस्थानी त्याच्यासोबत नेण्याच्या बहाण्याने परत घेऊन गेला.

जमीन खरेदीसाठी पाच लाखांची मागणी

काही महिन्यांनी पूजा आणि पती कल्याण पश्चिम बंगालला परतले. त्यावेळी पूजाने तिच्या वडिलांना सांगितले की तिचा पती क्षुल्लक कारणावरुन तिला शिवीगाळ आणि मारहाण करतो. मे महिन्यात कल्याण मुंबईत पुन्हा कामावर रुजू झाला. मंडल यांचा दावा आहे की, पूजाच्या सासरच्यांनी तिच्याकडे शेतजमीन खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी मंडल यांनी लेकीला तीन लाख रुपये दिल्याचेही सांगितले.

मानेवर पाय ठेवून मारहाण

सप्टेंबर महिन्यात कल्याण पूजाला मुंबईला घेऊन गेला. पण काही दिवसातच डॉ. मंडल यांना समजले की तिला पुन्हा मारहाण केली जात आहे. “माझ्या मुलीने मला सांगितले की तिच्या पतीने तिला अमानुष पद्धतीने मारहाण केली, आणि एकदा तिच्या मानेवर पाय ठेवला. तिने मला विनंती केली की तुम्ही मुंबईला या आणि मला पश्चिम बंगालला घेऊन जा. 10 ऑक्टोबरलाही तिने मला रात्री फोन केला आणि मदतीसाठी रडत होती, ” असं डॉ. मंडल म्हणाले.

त्याच दिवशी पूजाने कल्याण चाकीविरुद्ध कफ परेड पोलिसांकडे IPC कलम 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला. 11 ऑक्टोबर रोजी डॉ मंडल यांनी पूजासाठी विमान तिकीट बुक केले, पण लसीकरण न झालेले असल्यामुळे ती विमानात बसू शकली नाही.

वडिलांच्या फोनला पूजाचे उत्तर नाही

डॉ. मंडल म्हणाले की त्यांनी 11 ऑक्टोबर रोजी पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिने कॉलला उत्तर दिले नाही. संध्याकाळी 5.20 वाजताच्या सुमारास त्यांनी कल्याणच्या मोबाईलवर फोन केला आणि पूजाशी बोलू देण्यास सांगितले. तो म्हणाला, की मी तिच्याशी बोललो आहे. ती झोपली होती म्हणूनच तुमच्या फोनला उत्तर दिले नाही.

अवघ्या 10 मिनिटांनंतर, डॉ मंडल म्हणाले की कल्याणने आपल्याला फोन केला आणि सांगितले की पूजाने बेडरुममध्ये गळफास लावला आहे. तो तिला आयएनएचएस अस्विनी रुग्णालयात घेऊन जात आहे. रात्री 8 वाजताच्या सुमारास कल्याणने डॉ मंडलला फोन केला आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे सांगितले.

“डॉ. मंडल यांचे कुटुंब मुंबईत आले आणि त्यांनी IPC कलम 304B (हुंडाबळी), 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 323, 34, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला. कल्याण चाकी, त्याचा भाऊ कर्ण, आई मीठू आणि वडील कृष्णा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल असल्याची माहिती कफ परेड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी दिली.

संबंधित बातम्या :

आधी बोट कापलं, आता गळा कापू, ठाण्यात फेरीवाल्याची अतिक्रमणविरोधी कर्मचाऱ्याला धमकी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मेव्हण्याच्या मित्राची हत्या, SRPF जवान ऊसाच्या शेतात सापडला

जळगावमध्ये मांजरीनं कोंबडीवर ताव मारला तर मालकानं बंदुकीची गोळी डोक्यात घातली