मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंना हायकोर्टाने दिलासा, 7 सप्टेंबरपर्यंत कारवाई टळली

| Updated on: Aug 25, 2021 | 12:09 PM

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक, विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ करणे अशा आरोपांनंतर नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंना हायकोर्टाने दिलासा, 7 सप्टेंबरपर्यंत कारवाई टळली
गजानन काळे आणि संजीवनी काळे
Follow us on

नवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. पत्नी संजीवनी काळे (Sanjeevani Kale) यांनी गजानन काळेंविरोधात विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार आहेत.

काय आहे प्रकरण?

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक, विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ करणे अशा आरोपांनंतर नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही… तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.

गजानन काळेंचा शोध सुरु

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून गजानन काळे यांचा मोबाईल फोन स्वीच ऑफ आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दर्शविला होता. नवी मुंबईतील नागरिकांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दिला आहे.

कोण आहेत गजानन काळे?

गजानन काळे हे विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी संघटनेत ते कार्यरत होते. भारतीय छात्र भारती या विद्यार्थी संघटनेतून त्यांच्या राजकीय कार्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली. फि वाढीविरोधातील आंदोलन असो, प्रवेश प्रक्रियेतील घोळ, निकाल लागण्यात होणारी दिरंगाई असो की विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो. प्रत्येक आघाडीवर काळे यांनी जोरदार आंदोलने केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी कधी विद्यापीठाच्या गेटवर तर कधी आझाद मैदानात त्यांनी आंदोलने केली. तर कधी महाविद्यालयांमध्ये घुसून महाविद्यालयांमधील मनमानी कारभारा विरोधातही आंदोलने केली.

मनसेत प्रवेश

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली. राज ठाकरे यांचा आक्रमक स्वभाव आणि भाषणशैलीवर प्रभावीत होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला. त्यात गजानन काळे यांचाही समावेश होता. त्यांनीही मनसेत प्रवेश केला. मनसेत आल्यानंतर त्यांनी कामाचा धडका लावला. गणेश नाईक यांचं नवी मुंबईवर अधिराज्य आहे. त्यातच शिवसेनाही बलवान आहे. ही सर्व आव्हाने असताना काळे यांनी नवी मुंबईत मनसेचं संघटन मजबूत करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

संबंधित बातम्या :

वहिनी मला न्याय देतील, संजीवनी काळे कृष्णकुंजवर, शर्मिला ठाकरेंना कैफियत सांगितली!

विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?