ठाण्यात 3 वर्षाच्या लेकराचा आधी बलात्कार केला, नंतर खडकावर डोकं आपटून हत्या, आता हायकोर्टाकडून फाशीची शिक्षा

| Updated on: Nov 26, 2021 | 8:56 AM

पॉक्सो कायद्या अंतर्गत मुंबईच्या विशेष खटले न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 2019 मध्ये आरोपीला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला हायकोर्टाने पुष्टी दिली. आरोपी रामकिरत गौडचे वकील सचिन पवार यांनी हे संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून असल्याचा युक्तिवाद केला होता

ठाण्यात 3 वर्षाच्या लेकराचा आधी बलात्कार केला, नंतर खडकावर डोकं आपटून हत्या, आता हायकोर्टाकडून फाशीची शिक्षा
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : 2013 मध्ये ठाण्यातील तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी 32 वर्षीय तरुणाच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले. रामकिरत गौड या त्यावेळी विशीत असलेल्या तरुणाने चिमुकलीवर बलात्कार करुन तिचे डोके दगडाने ठेचले होते आणि मृतदेह चिखलात टाकला होता. घटनेच्या चार दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला होता.

दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरण

पीडितेच्या वडिलांना 30 दिवसांच्या आत 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही हायकोर्टाने राज्याला दिले आहेत. मुलीसोबत झालेली विटंबना आणि आरोपीची विकृती पाहता, त्याचे असंस्कृत आणि अमानुष वर्तन लक्षा घेता हे दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरण ठरले आहे, त्यामुळे दोषीला फाशीची शिक्षा देणे योग्य आहे, असे न्यायमूर्ती साधना जाधव आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सांगितले. हा एक अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. जो आपल्या निरागस लेकराला इंद्रधनूने व्यापलेले जग पाहायला पाठवण्याआधीच पालकांच्या मनात शिरशिरी आणेल, असेही मत कोर्टाने नोंदवले.

“औदार्य दाखवलं, तर समाजासाठी धोका”

पॉक्सो कायद्या अंतर्गत मुंबईच्या विशेष खटले न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 2019 मध्ये आरोपीला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला हायकोर्टाने पुष्टी दिली. आरोपी रामकिरत गौडचे वकील सचिन पवार यांनी हे संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून असल्याचा युक्तिवाद केला. परंतु अतिरिक्त सरकारी वकील मानकुवर देशमुख यांनी पुराव्यांकडे लक्ष वेधले. या क्रूर गुन्ह्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. हा स्पष्टपणे दुर्मिळातील दुर्मीळ श्रेणीमध्ये मोडतो; जर आरोपीच्या बाबतीत औदार्य दाखवलं, तर तो समाजासाठी धोका ठरेल, असंही देशमुख यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशातून नोकरीच्या शोधात आलेल्या आरोपी रामकिरत गौडला 3 ऑक्टोबर 2013 रोजी अटक करण्यात आली होती.

आरोपी दोन मुली आणि एका मुलाचा बाप

मुलीच्या शरीरावर घोंघावणाऱ्या माशांवरुन तपासण्यात आलेली गुन्ह्याची वेळ आरोपीच्या शरीरावरील अस्पष्ट जखमांशी जुळते, असे हायकोर्टाने म्हटले आहे. आरोपीला कोणताही पश्चात्ताप झालेला दिसत नाही. दोन मुली आणि एका मुलाचा बाप असलेल्या माणसाच्या मनातील वासनेची भावना एक आनंदी चिमुरडी उत्तेजित करु शकते, हे अकल्पित आणि अनाकलनीय आहे, असं मतही खंडपीठाने मांडलं.

बलात्कार पीडितांसाठी असलेल्या सरकारी योजने अंतर्गत भरपाई देण्यात आली नाही, कारण मुलीच्या आईने तिच्या हत्येच्या दोन वर्षांआधीच तिला सोडून दिले होते आणि तिच्या मृत्यूनंतरही ती परतली नव्हती, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

संबंधित बातम्या :

नागपुरात इंटर्न डॉक्टरवर बंदूक ताणणारा युवक पुण्यात सापडला, आत्महत्या करण्याच्या तयारीत?

Aruna Shanbaug | 25 व्या वर्षी लैंगिक अत्याचार, 42 वर्ष मृत्यूशय्येवर, अरुणा शानबाग यांची करुण कहाणी

Pune crime | जमीन देत नसल्याच्या रागातून गावगुंडांची महिला व मुलींना मारहाण