Mumbai Gold Loot : ईडी अधिकारी बनून आले अन् सोने लुटून पसार झाले, 24 तासाच्या आत पोलिसांनी ‘असा’ लावला छडा

| Updated on: Jan 25, 2023 | 1:18 PM

छापेमारीचं नाटक करून आरोपीने दुकानातून तब्बल तीन किलो सोनं आणि 25 लाखांची रोकड घेऊन पळ काढला. ही छापेमारी करत असताना दुकानातील काही कर्मचाऱ्यांच्या हातात बेड्या टाकून एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाण्याचे नाटक सुद्धा या तोतया ईडी अधिकाऱ्यांनी केलं.

Mumbai Gold Loot : ईडी अधिकारी बनून आले अन् सोने लुटून पसार झाले, 24 तासाच्या आत पोलिसांनी असा लावला छडा
तोतया ईडी अधिकाऱ्यांकडून ज्वेलर्सची लूट
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : ईडीचे अधिकारी आहोत अशी बतावणी करत एका व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून तब्बल 25 लाखांची रोकड आणि तीन किलो सोने घेऊन पसार झालेल्या एका गॅंगला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. मुंबईतल्या एलटी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या झवेरी बाजारमधल्या एका बुलीयनच्या दुकानात काल काहीजण अचानकपणे घुसले. आम्ही ईडीचे अधिकारी आहोत, आम्हाला दुकानाची झाडाझडती घ्यायची आहे, विराट कुठे आहे ? अशी विचारणा करत त्यांनी दुकानाची छाननी करायला सुरुवात केली. दुकानात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण देखील आरोपींनी केली.

छापेमारीचं नाटक तब्बल 3 किलो सोनं लुटलं

छापेमारीचं नाटक करून आरोपीने दुकानातून तब्बल तीन किलो सोनं आणि 25 लाखांची रोकड घेऊन पळ काढला. ही छापेमारी करत असताना दुकानातील काही कर्मचाऱ्यांच्या हातात बेड्या टाकून एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाण्याचे नाटक सुद्धा या तोतया ईडी अधिकाऱ्यांनी केलं.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला

याप्रकरणी मुंबईतील एल टी मार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून काही आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी विविध टीम बनवून आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

तपासादरम्यान डोंगरीमध्ये राहणारा मोहम्मद फजल हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झालं. एल टी मार्ग पोलिसांनी मोहम्मद फजल आणि त्याचा मित्र समीर उर्फ मोहम्मद रजीक याला देखील मुंबईतून अटक केली. आरोपीसोबत तोतया ईडी अधिकारी बनून या गुन्ह्यात सहभागी झालेल्या एक महिलेलाही पोलिसांनी रत्नागिरीमधून अटक केली आहे.

24 तासांच्या आत आरोपींना अटक

समोरच्यांना अधिक खात्री पटावी यासाठी ही महिला आरोपी ईडी अधिकारी बनून छापेमारीसाठी गेली होती. विशाखा मुधोळ असे या महिला आरोपीचे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत या आरोपींना एल टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

अटक आरोपींनी चोरी केलेल्या तीन किलो सोनं आणि 25 लाखांच्या रोख रकमेपैकी अडीच किलो सोन आणि 15 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालं आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.