वकील रस्त्याने जात असताना अचानक दुचाकीवरुन दोन जण आले, मोबाईल हिसकावला आणि….

| Updated on: Aug 02, 2021 | 8:13 PM

ठाण्यातील एका वकिलाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघा मोबाईल चोरट्यांना सीसीटीव्हीचा आधार घेत ठाणेनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

वकील रस्त्याने जात असताना अचानक दुचाकीवरुन दोन जण आले, मोबाईल हिसकावला आणि....
वकील रस्त्याने जात असताना अचानक दुचाकीवरुन दोन जण आले आणि मोबाईल हिसकावला
Follow us on

ठाणे : ठाण्यातील एका वकिलाच्या मोबाईलची चोरी करणाऱ्या दोघा मोबाईल चोरट्यांना सीसीटीव्हीचा आधार घेत ठाणेनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सागर यादव आणि हेमंत थानवी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अटकेतल्या चोरट्यांकडून 2 दुचाकी आणि 16 मोबाईल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

ठाणे न्यायालयात वकिली करणारे या घटनेतील फिर्यादी 22 जुलै 2021 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथून पायी जात होते. त्याचवेळी बाईकवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी वकिलांच्या हातातील 24 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला होता. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याप्रकरणी सदर वकिलांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने भिवंडीतून सागर आणि हेमंत या दोघांना 23 जुलैला अटक केली. या दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2, नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत 3 तर राबोडीत 1 असे 6 मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि चोरीतील 16 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत 4 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.

दोन्ही आरोपी आपल्या पालकांना स्वीगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचे सांगत. मात्र हे दोघे प्रत्यक्षात दुचाकीने मोबाईल चोरी करत, अशी माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.

हेही वाचा : मोठी बातमी ! राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम