
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रायव्हेट ट्युशन टीचरने फक्त खराब हस्ताक्षराच्या कारणामुळे सात वर्षांच्या निरागस विद्यार्थ्याला भयानक शिक्षा दिली. या टीचरने केवळ त्याला निर्दयीपणे मारलंच नाही तर त्याच्या हाताला मेणबत्तीचे चटकेसुद्धा दिले. ही धक्कादायक घटना मुंबईतील मालाड परिसरातील कुरार विलेजमध्ये घडली आहे. इथल्या एका पॉश इमारतीत ही आरोपी टीचर विद्यार्थ्यांना शिकवते. जेव्हा पीडित विद्यार्थी रडत रडत त्याच्या कुटुंबीयांकडे पोहोचले आणि आईवडिलांकडे तक्रार केली, तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला.
मुलाच्या हातावर चटक्यांचे डाग होते. हे डाग पाहून त्याचे कुटुंबीय सुन्न झाले होते. त्यांनी त्वरितच कुरार पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही याप्रकरणी ताबडतोब कारवाई करत शिक्षिकेला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी या आरोपी शिक्षिकेला बोरीवली कोर्टात सादर केलं जाणार आहे. पोलीस तिच्या कोठडीची मागणी करणार आहेत.
कुरार पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना दिंडोशी कोर्टाजवळील एका इमारतीत घडली आहे. या इमारतीत संबंधित शिक्षिका विद्यार्थ्यांचे ट्युशन घ्यायची. तिथे शिकायला येणाऱ्या एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याचं हस्ताक्षर नीट नसल्याने आधी ती त्याच्यावर ओरडली. त्यानंतर शिक्षा म्हणून तिने त्याच्या हातावर मेणबत्तीचे चटके दिले. या क्रूर कृत्यामुळे मुलाच्या हातावर फोड आले आणि तो खूप घाबरला होता. याबद्दल जेव्हा त्याने घरी सांगितलं, तेव्हा त्यांनी शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी शिक्षिकेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यात कोणतीही शिक्षिका किंवा शिक्षक असं वागणार नाही, अशी मागणी केली जात आहे. शाळेत किंवा ट्युशनमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यावरून अनेक नियम आहेत. अशा प्रकारच्या अमानुष वागणुकीविरोधात परिसरातील नागरिकांनी आवाज उठवला आहे. विद्यार्थी पुन्हा ट्युशनला जाण्यास घाबरत असल्याचीही तक्रार पालकांनी केली आहे.