
एखाद्या वाईट गोष्टीचा नाद लोकांचे आयुष्य बरबाद करते. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. शहरातील धंतोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव आशिष रेडिमल्ला असे आहे. तो एम.टेक आहे आणि त्याने पुणे आणि नागपूरमधील आयटी कंपन्यांमध्ये कामही केलेलं आहे. त्याला पगारही चांगला होता, मात्र वाईट संगतीमुळे त्याला जुगाराचे व्यसन लागले आणि या व्यसनाने त्याचे आर्थिक नुकसान तर झालेच, तसेच तो एक अट्टल गुन्हेगारही बनला. या तरुणासोबत नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
आशिष रेडिमल्लाला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याने धंतोली परिसरातील शीतल चिंतलवारच्या घरात चोरी केली होती. प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचे एक स्केच तयार केले आणि त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे आशिष रेडिमल्लाला अटक केली. यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने नागपूरच्या इतर भागातही चोरी केल्याची कबूली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष रेडिमल्लाला जुगार खेळण्याचा नाद होता. जुगारात त्याने 23 लाख रुपये गमावले होते, त्यामुळे त्याच्यावर कर्जही झाले होते. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. तो नोकरी करत असताना नागपूरच्या छत्रपती नगर भागात रहायचा. त्यामुळे त्याला या भागातील घरांची माहिती होती. त्याने निर्जन बंगल्यामध्ये चोरी करण्यास सुरुवात केली, आतापर्यंत पाच घरांमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष चोरी करण्यासाठी चंद्रपूरवरुन नागपूरला बसने यायचा. घरांची रेकी करायचा आणि नंतर चोरी करायचा. त्यामुळे चोरीच्या बऱ्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिस आरोपीचा शोध घेत होते, आता आरोपीला अटक केल्यानंतर धंतोली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिक मिर्झापुरे यांनी सांगितले की, आरोपीने स्वतः गुन्ह्याची कबूली दिली आहे. तसेच त्याने पैशासाठी चोरी केल्याचे आणि नागपूरच्या अनेक भागात चोरी केल्याचे कबूल केला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.