आईला मारहाण केल्याच्या रागातून मोठ्या भावाची हत्या, 36 वर्षीय तरुणाला नागपुरात अटक

| Updated on: Jul 15, 2021 | 10:44 AM

आईला मारहाण केल्याच्या रागातून धाकटा भाऊ प्रमोद मसराम याने मोठ्या भावावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना बुधवारी (15 जुलै) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती

आईला मारहाण केल्याच्या रागातून मोठ्या भावाची हत्या, 36 वर्षीय तरुणाला नागपुरात अटक
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नागपूर : आईला मारहाण केल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरमध्ये
रामटेक तालुक्यातील देवलापूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या चारगावमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी 36 वर्षीय आरोपी प्रमोद मसरामला पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा मसराम (वय 38) असं मयत भावाचं नाव आहे.

आईला मारहाण केल्याच्या रागातून धाकटा भाऊ प्रमोद मसराम याने मोठ्या भावावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना बुधवारी (15 जुलै) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. हत्येनंतर चार तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

नेमकं काय घडलं?

मयत कृष्णा मसराम हा मूळ चारगाव येथील रहिवासी असून तो मौदी येथे राहत होता. आरोपी प्रमोदही भावासोबत राहायचा. मात्र दोघांमध्ये नेहमी वादविवाद होत असल्याने तो खसाळा येथे राहू लागला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास कृष्णा आई वडील राहत असलेल्या चारगाव येथे गेला. त्याने आई दसवंती यांना मारहाण केली. यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचा दावा केला जात आहे. भावाने आईला मारहाण केल्याचं समजताच आरोपी प्रमोद लगेच चारगावला गेला. आधी नातेवाईकांच्या मदतीने त्याने आईला खासगी दवाखान्यात नेले.

भावाच्या घरी जाऊन हल्ला

आईची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी रात्री तिला नागपूर येथील मेडिकलमध्ये नेण्यास सांगितले. आरोपी प्रमोद आईसोबत रुग्णवाहिकेत न जाता आधार कार्ड आणण्याच्या बहाण्याने थेट मौदी येथे गेला. त्यावेळी मोठा भाऊ कृष्णा घरी होता. प्रमोदने संतापाच्या भरात त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये थोरल्या भावाचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार कुणाच्याही लक्षात येण्याआधीच प्रमोद आईजवळ गेला.

कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे समजल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

बायकोच्या छळाला प्रवृत्त करणारा पुण्याचा राजकीय गुरु रघुनाथ येमुल जामिनावर सुटला

कोयत्याने वार करत सावत्र आईची हत्या, पुण्यात 17 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात

(Nagpur Younger brother allegedly killed Elder brother for beating Mother)