औरंगाबाद जेलमध्ये कट रचला, भावाने बहिणीचं कुंकू पुसलं, करण परोपटे हत्याकांडात मोठा खुलासा

| Updated on: Jun 25, 2021 | 1:15 PM

आरोपींविरुद्ध मुख्य सूत्रधार अक्षय राठोडची बहीण आणि मयत करण परोपटे याची पत्नी आभा परोपटे हिनेच तक्रार दिली. यवतमाळ शहरातील हॉटेलसमोर उभा असताना चार ते पाच तरुणांनी अचानक येऊन करणवर बेछूट गोळीबार केला होता.

औरंगाबाद जेलमध्ये कट रचला, भावाने बहिणीचं कुंकू पुसलं, करण परोपटे हत्याकांडात मोठा खुलासा
मयत करण परोपटे
Follow us on

यवतमाळ : यवतमाळमधील करण परोपटे हत्याकांडात (Karan Paropate Murder) अक्षय राठोड टोळीचा म्होरक्या अक्षय राठोडच (Akshay Rathod) मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद कारागृहात करणच्या हत्येचा कट शिजल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे भावानेच बहिणीचे कुंकू पुसल्याचे समोर आले आहे. कारण आरोपी अक्षय राठोड हा मयत करण परोपटेचा मेव्हणा होता. करण हा राठोडच्याच टोळीसाठी कामही करत होता, मात्र वादातून दोघांमध्ये वैमनस्य आल्याची चर्चा आहे. (Yawatmal Karan Paropate Murder case Akshay Rathod Gang booked)

बहिणीची भावाविरोधात तक्रार

29 वर्षीय करण परोपटेच्या खून प्रकरणी मुख्य सूत्रधार अक्षय राठोड, आशिष उर्फ बगिरा दांडेकर, शुभम बघेल, धीरज उर्फ बँड, प्रवीण केराम, दिनेश तुरकाने, नितेश मडावी, दिलीप ठक्कर, अर्जुन भांजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध मुख्य सूत्रधार अक्षय राठोडची बहीण आणि मयत करण परोपटे याची पत्नी आभा परोपटे हिनेच तक्रार दिली. पसार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

अक्षय राठोडच्याच टोळीचा सदस्य

रेतीच्या व्यवसायावरुन ही हत्या झाली असल्याची माहिती आहे. खरं तर कुख्यात गुंड करण परोपटे हा सध्या एमपीडीए अंतर्गत कारागृहात असलेल्या अक्षय राठोडच्याच टोळीचा सदस्य होता. मात्र काही दिवसांपूर्वी यवतमाळ शहरातील चांदोरे नगरात करण आणि अक्षय टोळीतील एका सदस्याचा वाद झाला होता. याबाबत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. यातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

काय घडलं नेमकं?

बाभुळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथे राहणारा गुन्हेगारी वृत्तीचा करण परोपटे हा काही कामानिमित्त बुधवारी यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात आला होता. यावेळी तो एका हॉटेलसमोर उभा असताना रात्री 9 वाजताच्या सुमारास चार ते पाच तरुणांनी अचानक येऊन करणवर बेछूट गोळीबार केला होता.

उपचारादरम्यान मृत्यू

या गोळीबारमध्ये करण परोपटे आणि हॉटेल चालक गुप्ता गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यात उपचारादरम्यान करण परोपटे याचा मृत्यू झाला. करण परोपटे खून प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन एक जिवंत काडतुस, तीन रिकाम्या केस (काडतुसे) आणि एक धारदार चाकू आदी साहित्य जप्त केले होते.

संबंधित बातम्या :

SBI चौकात बेछूट गोळीबार, 29 वर्षीय गुंडाची हत्या, हॉटेलचालक जखमी

बहिणीला मारहाण करणाऱ्या भाऊजींशी झटापट, चाकू खुपसून मेहुण्याने जीव घेतला

(Yawatmal Karan Paropate Murder case Akshay Rathod Gang booked)