एकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या

| Updated on: Sep 22, 2021 | 11:14 PM

गाणं ऐकत असताना गाण्याचा गायक कोण यावरुन वाद झाला आणि मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. संबंधित घटना ही नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत घडली.

एकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या
मृतक तुषार बैस
Follow us on

नागपूर : नागपुरात हत्येचं सत्र थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाहीय. शहरात फार क्षुल्लक कारणांवरुन हत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. गाणं ऐकत असताना गाण्याचा गायक कोण यावरुन वाद झाला आणि मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. संबंधित घटना ही नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत घडली. मृतक तरुणाचं नाव तुषार बैस असं आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

तीन मित्र रात्रीच्या वेळी एकत्र जमले. त्यांनी खरंतर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत ते दारु प्यायले. यावेळी त्यांनी गाणे लावले होते. पण गाणे सुरु असताना त्यांच्या सेलिब्रेशनचा मार्ग भरकटला. पार्टीत सुरु असलेल्या गाण्याचा गायक कोण यावरुन त्यांच्यात मतभेद झाले. याच मदतभेदातून त्यांच्यात मोठा वाद झाला. अखेर वाद मिटला आणि ते तिथून निघून गेले. पण थोडं पुढे गेल्यावर पुन्हा त्याच मुद्द्यावरुन त्यांच्यात वाद झाला.

वादातून मित्रावर चाकू हल्ला

या भांडणा दरम्यान एक आरोपी त्याच्या घरी गेला. घरुन तो धारदार चाकू घेऊन आला. त्यानंतर त्याने त्या चाकूने तुषार बैस याच्यावर वार केले. या हल्ल्यात तुषार रक्तबंबाळ झाला. या घटनेनंतर आरोपीदेखील भेदरला. तो जखमी तुषारला रुग्णालयात घेऊन गेला. पण त्यानंतर तो फरार झाला. संबंधित घटना रात्री घडली होती. पण सकाळी तुषारचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून दोन आरोपींना बेड्या

रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी मृतकाची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी तपास करत सर्व प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मृतक हा रात्री मित्रांसोबत पार्टीसाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यामुळे मृतकाच्या फरार मित्रांचा शोध घेतला. पोलिसांना या तपासात यश आलं आणि या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींसोबत पार्टीमध्ये एक मुलगीदेखील असल्याची माहिती पुढे आली आहे. पण त्याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

मित्रानेच मित्राची हत्या कशी केली? स्थानिकांचा सवाल

“मी शिक्षित आहे आणि तू कमी शिक्षित आहेस. तुला काही कळत नाही”, असा मोठेपणाचा आव आणल्याने हा प्रकार घडल्याची माहिती काही सूत्रांनी पोलिसांना दिलीय. मात्र क्षुल्लक कारणावरुन एका मित्राची हत्या केल्याच्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच मित्रच आपल्या मित्राची अशी निर्घृणपणे हत्या कशी करु शकतो? असा सवाल स्थानिक नागरीक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा :

स्किजोफ्रेनिया आजाराच्या नावाने लाखो लुबाडले, रुग्णांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड पटविण्याचा सल्ला, विरारमध्ये बोगस डॉक्टराचा भंडाफोड

महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येनंतर अयोध्येत आणखी एका साधूचा संशयास्पद मृत्यू, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू