
कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरूणीला एका अमराठी इसमाने प्रचंड मारहाण केली. तिचा डोकं धरून केस ओढले, लाथा-बुक्क्यांनी एवढं तुडवलं की त्या मुलीच्या अंगावर काळेनिळे वण आले, तिच्या मानेला, छातीला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडूनही याप्रकरणाचा तपास सुरू आहे. याच दरम्यान आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. क्लिनिकमध्ये त्या तरूणीला मारहाण केल्याचा आरोप असलेला इसम गोकूळ झा हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याच्या आईने याप्रकरणी मोठा खुलासा करत काही दावे केले आहेत.
माझ्या नातीला बरं नव्हतं म्हणून आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो, तेव्हा माझा मुलगा (आरोपी झा) डॉक्टरांना सांगायला गेला असता रिसेप्शनवर असलेल्या त्या तरूणीने तुम्हाला अक्कल नाही का असे सांगत वाद निर्माण केला, असं आरोपीच्या आईने नमूद केलं आहे. त्या दिवशी नेमकं काय-काय घडलं हे सगळंच आरोपीची आई छेमा झा यांनी सांगितलं आहे.
Video : कल्याणात पुन्हा पेटला मराठी वि. अमराठी वाद, क्लिनिकमध्ये तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
काय म्हणाल्या छेमा झा ?
घटना घडली त्या दिवशी आम्ही आमच्या मुलाच्या लहान मुलीला घेऊन रुग्णालयात गेलो होतो. तिला खोकला आणि उलटी होत होती, म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो, पण आम्हाला तिथे थांबून ठेवण्यात आलं होतं. माझ्या नातीची तब्येत बरी नव्हती, हे पाहून माझा मुलगा ( आरोपी गोकूळ) त्याबद्दल डॉक्टरांना सांगायला गेला. मात्र त्यावेळेस रिसेप्शनला असलेल्या या तरुणीने तुम्हाला अक्कल नाही का असे सांगत वाद निर्माण केला.
त्यामुळे माझ्या मुलाने टेबलाला लाथ मारली, पण वाद वाढू नये म्हणून आम्ही त्याला सोडून त्या ठिकाणाहून बाहेर नेलं . पण त्या रिसेप्शिस्ट मुलीने माझ्या सुनेला (मुलाच्या पत्नीला) मारलं, हे माझ्या मुलाने पाहिलं आणि ते पाहून त्याला खूप राग आला. त्याच रागात तो आतमध्ये आला आणि त्याने त्या रिसेप्शनिस्ट मुलीच्या पोटात लाथ मारली, तिचे केस ओढले, तिला मारहाण केली, असं छेमा झा म्हणाल्या.
माझ्या मुलाला लवकर येतो राग
झालेली गोष्ट ही चुकीची आहे आम्ही मान्य करतो . माझ्या मुलाच्या डोक्याला एका अपघातात मार लागला आहे, त्याला लवकर राग येतो. त्यामुळे तो असं वागतो. आमच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने, आम्ही त्याच्यावर अजून उपचार केला नाही. माझा मोठा मुलगा चांगला आहे. आम्ही सगळ्यांची माफी मागतो आमच्या मोठ्या मुलाला सोडा असं म्हणतं त्यांनी मुलाला सोडावं अशी मागणी केली.