Video : कल्याणात पुन्हा पेटला मराठी वि. अमराठी वाद, क्लिनिकमध्ये तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
कल्याणच्या नांदिवली येथील एका खाजगी क्लिनिकमध्ये मराठी तरूणी रिसेप्शनिस्टवर झालेल्या बेदम मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एका परप्रांतीय तरूणाने ही मारहाण केली आहे. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे राज्यातील मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा पेटू शकतो. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरूणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे, कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका क्लिनिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली. एका परप्रांतीय तरूणाने रिसेप्शिस्ट म्हणून काम करणाऱ्या त्या तरूणीला आतमध्ये घुसून लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यामध्ये त्या मारहाणीची भीषणता दिसून येते.
डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा , इतंकच ही तरूणी बोलली होती, मात्र ते ऐकल्यांतर तो तरूण तिरमिरीने आता शिरला आणि काहीही विचार न करता त्याने त्या तरूणीला बुकलायला सुरूवात केली. याप्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यामुळे राज्यात कित्येक दिवसांपासून सुरू असलेला मराठी. वि. अमराठी हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे असून वाद आणखी चिघळू शकतो.
नेमकं काय घडलं ?
कल्याणच्या नांदिवली परिसरात एका खासगी रुग्णालयात पीडित तरूणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. तेथे डॉक्टरांना भेटण्यासाठी गोपाळ झा नावाचा हा परप्रांतीय इसम (MR) आला होता. मात्र डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच कोणीतरी बसलं होतं, त्यामुळे त्या मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीने समोर आलेल्या त्या इसमाला थोडं थांबण्यास सांगितलं.
पण ते ऐकल्यावर गोपाळ झा याने त्या रिसेप्शनिस्ट तरूणीशी वाद घालायला सुरूवात केली. एवढंच नव्हे तर ती तरूणी त्याच्याशी बोलत असताना पांढरा शर्ट आणि निळी पँट घातलेला हा इसम तावातावाने पुढे आला आणि त्या तरूणीच्या अंगावर धावून गेला. आधी त्याने तिला लाथ मारली, त्यामुळे ती तरूणी खाली पडली. नंतर त्याने तसंच तिच बखोट पकडलं, तिच्या केसांना धरून तिला फरपटत ओढलं आणि लाथा-बुक्क्यांनी तिला अमानुषपणे मारहाणही केली.
ते पाहून क्लिनिकमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्या इसमाला रोखण्याचा आणि त्या तरूणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या संपूर्ण घटनेत त्या तरूणीला बराच मार लागला असून ती चांगलीच जखमी देखील झाली आहे. ही दुर्दैवी घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर फरार झालेला आरोपी गोपाळ याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून नागरिकांकडूनही संताप व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा मराठी. वि अमराठी, परप्रांतीय असा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
