लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाला म्हणून खोट्या नोटा छापल्या, नाशकात सात जणांना अटक

| Updated on: Sep 14, 2021 | 2:37 PM

लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने आरोपींनी बनावट नोटा छापल्याचं समोर आलं आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सुरगाणामधून 7 जणांना अटक केली. आरोपी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत.

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाला म्हणून खोट्या नोटा छापल्या, नाशकात सात जणांना अटक
नाशकात बनावट नोटांची छपाई
Follow us on

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने बनावट नोटा छापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

काय आहे प्रकरण?

लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने आरोपींनी बनावट नोटा छापल्याचं समोर आलं आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सुरगाणामधून 7 जणांना अटक केली. आरोपी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत.

पावणे सात लाखा रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिकच्या विंचूर येथे नोटा छापल्या जात होत्या. नोटांचा आणखी वापर कुठे झाला याचा तपास सुरु आहे.

नाशिक नोट प्रेस चोरी प्रकरण

दरम्यान, नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा चोरीला गेल्याचा आरोप दोन महिन्यांपूर्वी झाला होता. तपासादरम्यान या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं होतं. करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी झाली नसून नजरचूक असल्याचा खुलासा करन्सी नोट प्रेस प्रशासनाने केला होता. ज्या दोन सुपरवायझरच्या नजरचुकीमुळे हा संपूर्ण गोंधळ घडला, त्या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. माात्र नोट प्रेस प्रशासनातल्या बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सुपरवायझरचा बळी दिला जात असल्याची चर्चा रंगली होती.

काय आहे प्रकरण?

हाय सिक्युरिटी झोन असलेल्या आणि देशभरातील नोटा छपाईचं मुख्य केंद्र असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये यापूर्वी देखील चोरीच्या तुरळक घटना घडल्या, मात्र प्रशासनाने अंतर्गत चौकशीतच हे प्रकरण निकाली काढले होते. तब्बल 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी आहे की अपहार याबाबत चौकशी सुरु करण्यात आली होती. हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याबाबत बोलण्यास नोट प्रेस प्रशासकीय अधिकारी किंवा युनियन लीडरही तयार नव्हते. अनेक दिवसांपासून 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता, पण प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस स्टेशन गाठावं लागलं, अशी चर्चा होती.

फेब्रुवारीपासून बंडल गहाळ

दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली. 500 रुपयांचे 10 तयार बंडल (शंभर नोटांचे एक बंडल) असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचं पोलिसांनी सांगितले होते. 12 फेब्रुवारीपासून हे बंडल गहाळ झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी अहवाल पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला होता. या तपासा दरम्यान करन्सी नोट प्रेसमधील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जाणार असल्याचं पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितलं होतं.

नाशिक करन्सी नोट प्रेसचा इतिहास

नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना 1924 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. 1928 मध्ये पहिल्यांदा 5 रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्येच नोटा छापल्या जात होत्या. 1980 नंतर करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईला सुरुवात झाली. करन्सी नोटप्रेसमध्ये 5, 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. वर्षाला सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.

संबंधित बातम्या:

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांच्या नोटा गायब

नोटा छपाईनंतर विशिष्ट टेबलनंतरच गहाळ, नाशिकच्या करन्सी नोट प्रेस चोरी प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे