अडीच महिन्यांत तीन वेळेस धाड… धाड… धाड… गोळीबारानं नागरिकांना भरली धडकी; नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय?

नाशिक शहरात गोळीबार करण्यासाठी गावठी कट्टे कुठून येतात असा सवाल उपस्थित होत आहे. याशिवाय गुन्हेगारीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अडीच महिन्यांत तीन वेळेस धाड... धाड... धाड... गोळीबारानं नागरिकांना भरली धडकी; नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 20, 2023 | 5:02 PM

नाशिक : शहरात कधीकाळी मारहानीची घटना किंवा कुणावर हल्ला झाला तरी पोलिसांची तात्काळ कारवाई होऊन गुन्हेगारांना धडा शिकवला जात होता. त्यामध्ये गुंडांची पोलिस धिंड काढून त्यांना पोलिसी खाक्या दाखवत होते. त्यामुळे पोलिस दिसताच अनेक गुन्हेगार धूम ठोकत होते. मात्र, अलिकडच्या काळात पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला नाही का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहे. शहरात जबरी चोऱ्या, खून आणि गोळीबार असे मोठे गुन्हे शहरात घडत आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिकमध्ये दोन अडीच महिन्यापूर्वी इंदिरा नगर येथील बोगद्याच्या ठिकाणी एकाने हवेत गोळीबार केला होता. तर दुसऱ्यांदा फायर करतांना बंदुकीतून गोळीबाहेर न आल्याने एक तरुण आणि त्याचा सहकारी थोडक्यात वाचला होता.

इंदिरानगर येथेल गोळीबार प्रकरणी थोडक्यात बचावलेल्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास त्यातील आरोपी दोन महिन्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना सापडले होते.

तर दुसरी घटना ही मागील काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. जुन्या भांडणाची कुरापत काढून यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात एक महिला आणि श्वान गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

पंचवटीतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांना अटक करण्यात यश आलेले नसतांना सातपुरच्या औद्योगिक वसाहतीत कार्बन नाका परिसरात गोळीबार करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामध्ये तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

एकूणच अडीच महिण्यात गोळीबार केल्याची ही तिसरी घटना असून शहर पोलिसांसमोर मोठं आवाहन निर्माण झाले आहे. पोलिस आता या प्रकरणातील संशयित आरोपींना कधी अटक करतात. हे पाहणं महत्वाचे ठरले. मात्र वारंवार अशा घटना घडत असल्याने शहरात गोळीबार करण्यासाठी गावठी कट्टे कुठून येतात हा देखील सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.