काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईला शिक्षणाचा त्रास नको म्हणून चिठ्ठी लिहित तरुणीने उचलले मोठे पाऊल
नाशिकमधील एका २० वर्षीय तरुणीने आर्थिक ताण आणि कुटुंबातील समस्यांमुळे आत्महत्या केली आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने शिक्षणाचा वाढता खर्च आणि आईवर पडणारा ताण याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

आई तुला त्रास द्यायचा नाही, माझा शैक्षणिक खर्च खूप जास्त आहे, तू ताण घेऊ नकोस. माझ्यामुळे तुझी धावपळ येते, अशी चिठ्ठी लिहित एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाशिक पोलीस दलात अंमलदार असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पूजा डांबरे असे या आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली. तिने लिहिलेली चिठ्ठी वाचून संपूर्ण नाशिक हादरलं आहे.
नेमकं काय घडलं?
पूजा डांबरे नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली होती. तिने पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता. पण दोन दिवसांपूर्वी तिने अचानक गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. हे ऐकल्यानंत पूजाचे नातेवाईक आणि तिच्या आईच्या पोलीस दलातील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला. पूजाचे आई-वडील विभक्त राहत होते. त्यामुळे ती तिच्या आईसोबत नाशिकच्या पंचवटीतील विडी कामगार नगरात राहत होती. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती.
तिची आई नोकरी सांभाळून पूजाच्या शिक्षणासाठी आणि घरासाठी खूप धावपळ करत होती. एकीकडे आई-वडिलांच्या नात्यातील दरी आणि दुसरीकडे घरची हलाखीची परिस्थिती यामुळे पूजा सतत नैराश्यात होती. आपल्या शिक्षणाच्या खर्चामुळे आईवर येणारा ताण पाहून ती खूप अस्वस्थ व्हायची. त्यात तिचा स्वभाव खूपच संवेदनशील होता. पूजाचं तिच्या आईवर जीवापाड प्रेम होतं. आपल्यामुळे आईला त्रास नको, याच विचाराने तिने हे टोकाचं पाऊल उचलले.
त्यापूर्वी तिने इंग्रजीतून सुसाईड नोट लिहिली आहे. आई तू तुझ्या कामामुळे फार व्यस्त असते. त्यामुळे मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. माझ्या शिक्षणाचे खर्च खूप जास्त आहेत. पण तू ताण घेऊ नकोस, असे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. आडगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिस हवालदाराची 7 वर्षीय मुलीसह आत्महत्या
दरम्यान नाशिक पोलीस दलातील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक रोड परिसरातील उपनगर पोलीस ठाण्यातील हवालदार स्वप्नील गायकवाड (३५) यांनी कौटुंबिक ताणतणावाला कंटाळून आपल्या सात वर्षीय मुलीला गळफास देऊन स्वतः आत्महत्या केली होती. या घटनांनंतर पोलिसांवर असलेला कामाचा ताण, कामाच्या अनियमित वेळा, कुटुंबातील सदस्यांशी कमी होत चाललेला संवाद, आरोग्याच्या तक्रारी यांसारखे महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले होते.
