
अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) एक मोठं ड्रग रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. “ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन” अंतर्गत डीआरआयने गुजरातच्या वलसाडमध्ये अल्प्राझोलम बनवणारा गुप्त कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाई अंतर्गत बहु-राज्यीय ड्रग नेटवर्कचा पर्दाफाश करत ते उद्ध्वस्त करण्यात आलं. तसेच चार जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज हे अधिकाऱ्यांनी जप्त केलं.
सिंथेटिक ड्रग्ज उत्पादनाला मोठा धक्का
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुजरातच्या वलसाडमध्ये गुजरात राज्य महामार्ग (एसएच) 701 जवळील विरळ लोकवस्ती असलेल्या ठिकाणी सिंथेटिक ड्रग्ज उत्पादनाला मोठा धक्का देत ही कारवाई केली. “ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन” या सांकेतिक नावाच्या या कारवाईत तब्बल 22 कोटी रुपयांचे अल्प्राझोलम जप्त करण्यात आले . तसेच चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वित्तपुरवठा करणारे आणि उत्पादक असलेले मास्टरमाइंड तसेच औषधाचा इच्छित प्राप्तकर्ता यांचा समावेश आहे.
कारवाईत कोणती ड्रग्ज जप्त ?
डी आर आयच्या या कारवाईमध्ये खाली नमूद केलेली ड्रग्स जप्त करण्यात आली.
– 9.55 किलो अल्प्राझोलम (पूर्ण स्वरूपात)
– 104.15 किलो अल्प्राझोलम (अर्ध-पूर्ण स्वरूपात)
– 431 किलो कच्चा माल, ज्यामध्ये पी-नायट्रोक्लोरोबेन्झिन, फॉस्फरस पेंटासल्फाइड, इथाइल एसीटेट आणि हायड्रोक्लोरिक असिड सारख्या प्रमुख रसायनांचा समावेश आहे.
– रिॲक्टर, सेंट्रीफ्यूज, औद्योगिक रेफ्रिजरेशन युनिट आणि हीटिंग मेंटलसह संपूर्ण औद्योगिक-प्रमाणात प्रक्रिया सेटअप ही जप्त करण्यात आला.
या कारवाईत अल्प्राझोलमच्या उत्पादनात आणि वित्तपुरवठ्यात थेट सहभागी असलेल्या दोन प्रमुख व्यक्तींना आणि उत्पादनात त्यांना मदत करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. तसेच ड्रग्स घेण्यासाठी तेलंगणाहून आलेल्या आरोपीलाही अटक करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. उत्पादित अल्प्राझोलम ही तेलंगणात संभवतः ताडीमध्ये मिसळण्यासाठी हा पुरवठा होता असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी डीआरआय मार्फत अधिक तपास सुरु आहे.