अनैतिक संबंधांच्या आरोपाखाली दाम्पत्याला चाबकाचा मार, विष्ठा खायला लावली, जातपंचायत समोर नग्न उभं केलं, पीडिताच्या आत्महत्येनंतर दोघांना बेड्या

| Updated on: Oct 07, 2021 | 11:37 PM

जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 जणांना अटक केली आहे. कालिदास काळे (वय 70) आणि दादा चव्हाण (वय 30) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अनैतिक संबंधांच्या आरोपाखाली दाम्पत्याला चाबकाचा मार, विष्ठा खायला लावली, जातपंचायत समोर नग्न उभं केलं, पीडिताच्या आत्महत्येनंतर दोघांना बेड्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

उस्मानाबाद : जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 जणांना अटक केली आहे. कालिदास काळे (वय 70) आणि दादा चव्हाण (वय 30) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आनंद नगर पोलीस ठाण्यात 25 जणांसह इतर 10 ते 15 जणांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा आणि जातपंचायत प्रतिबंधक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश पवार, पोहेकॉ प्रदीप ठाकूर, पोहेकॉ शिवाजी शेळके, पोना दिपक लाव्हरे पाटील, पोकाॅ गणेश सर्जे, पोकाॅ योगेश कोळी, चापोकाॅ  गोरे यांनी ही कारवाई केली.

जातपंचायतने जमिनीच्या व्यवहारात पती-पत्नीला ठोठावलेला 2 लाख रुपयांचा दंड न दिल्याने वाळीत टाकले होते. जातपंचायतीवर काटेरी चाबकाचे फटके मारून बळजबरीने विष्ठा खायला भाग पडल्याचा तर महिलेला जातपंचायत समोर नग्न उभे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपमान झाल्याने खचून पती-पत्नीने 24 सप्टेंबर रोजी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात पतीचा 4 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. सोमनाथ काळे यांचा सोलापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू तर फिर्यादी सुनीता काळे या बचवल्यानंतर प्रकरणाला वाचा फुटली.

नेमकं प्रकरण काय?

उस्मानाबादमधील काकानगरमधील सोमनाथ छगन काळे (45) आणि अनिता सोमनाथ काळे (40) यांच्याविरोधात जातपंचायत बसवण्यात आली होती. सोमनाथ यांच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवण्यात आला होता. यासाठी सांजा (ता. उस्मानाबाद) पेढी येथे 22 सप्टेंबरला ही पंचायत बसवण्यात आली होती. या आरोपामुळे पती-पत्नीला 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता. यातील 20 हजार रुपये वसूलदेखील करण्यात आले होते. मात्र उर्वरीत 1 लाख 80 हजार रुपयांसाठी या दाम्पत्यामागे जातपंचायतीने तगादा लावला होता. यामुळे या दाम्पत्याने वैतागून 24 सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना पत्नी अनिता यांची प्रकृती सुधारली, मात्र सोमनाथ यांची प्रकृती ढासळली. 30 सप्टेंबरला त्यांना सोलापूरला हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

शिक्षा एवढी भयंकर की आत्महत्येलाच कवटाळले…

काकानगर येथील जात पंचायतीचा धसका काळे दाम्पत्याने घेतला होता. ज्या दिवशी जातपंचायतीचे पंच सोमनाथ यांना घेऊन जाण्यासाठी येणार होते, त्या दिवशी ते प्रचंड तणावाखाली होते. पंच आणि पंचायतीची दहशतच एवढी होती की, शिक्षा भोगण्याऐवजी आत्महत्या बरी, असा निर्णय या दाम्पत्याने घेतला. त्यापूर्वी संबंधित पंचांच्या विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. जातपंचायतीकडून असे आरोप असलेल्यांना डोक्यावर 50 किलोचा दगड ठेवून मारहाण केली जाते, नग्न करुन काटेरी फोकाने मारतात, उकळत्या तेलात हात घालण्यास लावतात. गरम कुऱ्हाड 7 विड्याच्या पानांसह तळहातावर ठेवतात.

याआधीही भीतीपायी गाव सोडलं

सोमनाथ काळे मूळ पळसप या गावी राहत होते. तेथे एका अपघाताच्या प्रकरणात जातपंचायतीच्या छळामुळे त्यांनी गाव सोडले होते. तेव्हापासून ते काकानगरला राहत हाेते. तेव्हाही जातपंचायतीच्या पंचांनी अनैतिक संबंधांचा आरोप लावून त्यांना दंड ठोठावला. पळसप येथे त्यांची सुमारे २० एकर शेती असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले.

शववाहिनी नेली जिल्हाधिकाऱ्यांकडे, काही काळ तणाव

जातपंचायतीच्या धाकाने सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याने काळे यांचे नातेवाईक प्रचंड संतापले. त्यांनी मृतदेह असलेली शववाहिनी मंगळवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणलील. दुपारी 12 वाजेच्या सुमारास तेथे प्रचंड गोंधळ सुरु झाला. महिला नातेवाईकांनी तेथेच आक्रोश सुरु केला. त्यामुळे कार्यालयाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, तसेच दंगल नियंत्रक पथक दाखल झाले. बाराबलुतेदार संघटनेचे धनंजय शिंगाडेही तेथे आले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नातेवाईकांची भेट घेऊन सदर प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच मृतदेह आणि नातेवाईकांना संरक्षण देत अंत्यसंस्कार पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा :

बलात्कारात अपयशी ठरल्यानंतर बापाने मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली, सहा वर्षाची चिमुकली वेदनांनी विव्हळत राहिली

जिच्यासोबत सात जन्मांच्या सोबतीची शपथ घेतली तिनेच घात केला, प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं