खोलीत साप सोडून सासूची हत्या, प्रियकराच्या साथीने सुनेचं षडयंत्र, सरन्यायाधीश म्हणाले, लायकी नाही तुमची…

| Updated on: Oct 07, 2021 | 11:54 AM

सासूच्या रोजच्या कटकटीला कंटाळून महिलेने एक भयंकर कट रचला. एक असे षडयंत्र जे अपघातासारखे भासते आणि कोणालाही त्यावर संशय येत नाही. परंतु घटनेच्या दिवशी मृत महिलेची सून आणि एका पुरुषामध्ये 100 हून अधिक फोन कॉल्स झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिस चक्रावून गेले

खोलीत साप सोडून सासूची हत्या, प्रियकराच्या साथीने सुनेचं षडयंत्र, सरन्यायाधीश म्हणाले, लायकी नाही तुमची...
खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
Follow us on

नवी दिल्ली : साप चावल्यामुळे भारतात दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. सर्पदंश हा अपघात मानला जातो. मात्र सर्वोच्च न्यायालयात एक अनोखे प्रकरण समोर आले, ज्यात विषारी सापाचा वापर एखाद्याला जीवे ठार मारण्यासाठी ‘शस्त्र’ म्हणून केला गेला. एका वृद्ध महिलेला मारण्यासाठी विषारी सापाचा ‘शस्त्र’ म्हणून वापर करणे हा अपराध आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे. राजस्थानमधील या प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हे अनोखे प्रकरण सरन्यायाधीश एन व्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोळी यांच्या खंडपीठासमोर आले. सरन्यायाधीशांनी जामीन मिळवण्याची तुमची लायकी नाही, असं सांगितलं.

काय आहे प्रकरण?

या घटनेतील महिलेचा विवाह लष्करातील जवानाशी झाला होता, मात्र तो दुसऱ्या जिल्ह्यात तैनात होता. त्यामुळे महिलेचे प्रियकरासोबत असलेले संबंध दृढ झाले. दोघांचे फोनवर नियमितपणे बोलणे होते असे, मात्र तिच्या सासूला याची कुणकुण लागली आणि तिने सुनेला धारेवर धरलं. महिलेचे सासरे देखील नोकरीच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याबाहेर राहत होते. सासूच्या रोजच्या कटकटीला कंटाळून महिलेने एक भयंकर कट रचला. एक असे षडयंत्र जे अपघातासारखे भासते आणि कोणालाही त्यावर संशय येत नाही.

सासूच्या खोलीत बॅगमध्ये ठेवला साप 

या महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांसह राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील एका गारुड्याकडून विषारी सापाची व्यवस्था केली. साप एका पिशवीत टाकण्यात आला. 2 जून 2018 च्या रात्री महिलेने साप असलेली पिशवी सासूजवळ ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू मृतावस्थेत आढळली. ज्या हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आले, तिथे सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले गेले.

100 हून अधिक फोन कॉल्समुळे संशय

सर्पदंशामुळे होणारे मृत्यू राजस्थान आणि काही राज्यांमध्ये सर्वसामान्य बाब आहे. झुंझुनू पोलीस देखील याला सामान्य अपघात मानत होते. परंतु घटनेच्या दिवशी मृत महिलेची सून आणि एका पुरुषामध्ये 100 हून अधिक फोन कॉल्स झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिस चक्रावून गेले. हे दोघेही फोनवरुन एकमेकांशी बराच काळ संपर्कात असल्याचेही उघड झाले. तो माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून मृत महिलेच्या सूनेचा प्रियकर होता.

गारुडी झाला साक्षीदार

पोलिसांनी महिला, तिचा प्रियकर आणि तिच्या प्रियकराच्या मित्राला अटक केली. एवढेच नाही तर चौकशीच्या आधारावर या हत्येत ‘शस्त्र’ पुरवणाऱ्या गारुड्यापर्यंतही पोलिस पोहोचले. गारुडी या प्रकरणात साक्षीदार झाला आणि त्याने सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला, की त्याने त्या महिलेच्या प्रियकराच्या सांगण्यावरुन सापाची व्यवस्था केली होती.

प्रियकराच्या वकिलाचा अनोखा युक्तिवाद

महिलेच्या प्रियकराची बाजू मांडणारे वकील आदित्य कुमार चौधरी यांनी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर युक्तिवाद केला की त्यांचा अशील घटनास्थळी उपस्थित नव्हता. वकिलाने युक्तिवाद केला, ‘साप कोणाला चावणार हे माहित नसताना माझ्या अशिलाला षडयंत्राचा भाग कसे मानले जाऊ शकते? विषारी साप फक्त एका खोलीत सोडल्याचा अर्थ असा नाही की सापाने कोणाला चावावे हे त्याला माहीत आहे. पोलिसांनी कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता पडताळली नाही. माझा अशील एक वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात आहे.’ याकडे वकिलांनी लक्ष वेधले.

त्यावर खंडपीठाने खडसावले की, ‘राजस्थानमध्ये विषारी सापाचा खुनासाठी वापर करणे अगदी सामान्य आहे. निर्घृण हत्या करण्यासाठी तुम्ही अगदी वेगळा दृष्टिकोन घेतला आहे. तुम्ही कथितरीत्या या षडयंत्राचा भाग होता आणि गारुड्याच्या माध्यमातून तुम्ही खुनामध्ये वापरलेल्या शस्त्राची (साप) व्यवस्था केली. या टप्प्यावर जामिनावर सुटण्याची तुमची लायकी नाही.’

संबंधित बातम्या :

ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं

सोन्याच्या दागिन्यांचा हव्यास, चुलत सासूची हत्या करुन सुनेने दागिने ओरबाडले, कानाचेही लचके