
गेल्या २७ वर्षांपासून खटल्याचा निकाल लागत नसल्याने नैराश्य आलेल्या व्यक्तीने पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगवरून उडी मारुन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने न्यायालयाच्या आवारात खळबळ उडाली.केसचा निकाल लागत नसल्याने आलेल्या मानसिक तणावाने या व्यक्तीने न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,पुण जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एका पक्षकाराने उडी मारुन आयुष्य संपवले. न्याय मिळण्यास उशीर झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. ही घटना समजताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.
या तरुणाचे नाव नामदेव जाधव असे आहे. गेली अनेक वर्षे ते कोर्टात केस येईल या आशेने येत होते. पुण्याच्या वडकी भागात राहणारे नामदवे जाधव हे केस बोर्डावर येण्याची निकाल लागण्याची वाट पाहात होते. जमीनीच्या व्यवहारातून झालेल्या वादा संदर्भात त्यांची केस कोर्टात होती. या प्रकरणावर गेली २७ वर्षे तारखा पडत होत्या. परंतू न्याय मिळत नसल्याने ते प्रचंड नैराश्यात होते. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नामदेव यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलिस या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगवरून अशा प्रकाराने एका पक्षकाराने स्वतःचे जीवन संपवल्याने न्यायालयाच्या इमारतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता कोर्टात पोलिसांचा बंदोबस्त आणि तपासणी करण्याची मागणी होत आहे. भारतात जजेसच्या कमतरतेमुळे कोर्टात वर्षांनुवर्षे अनेक केस प्रलंबित असून त्यांना निपटारा होत नसल्याने न्याय मिळण्यास उशीर होत आहे.