
पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. 51 तोळे सोनं, फॉर्च्यूनर गाडी हुंडा म्हणून देऊनही सासरच्या मंडळींचा जाच चालूच असल्यामुळे वैष्णवीने स्वत:ला संपवलं आहे. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातीलच पिंपरी चिंचवड येथील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक 22 वर्षीय विवाहिता हुंडाबळी ठरली आहे. माहेरच्या मंडळींनी दुचाकी घेण्यासाठी 50 हजार रुपये न दिल्याने तिचा जाच चालू होता.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याती पिंपरी चिंचवड येथे वैष्णवी हगवणे हिच्याप्रमाणेच आणखी एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे ही विवाहिता अवघ्या 22 वर्षांची असून लग्नाच्या पाचव्या महिन्यातच तिने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेला होऊन एक महिना उलटला असून या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या याच हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय विवाहितेचे नाव पूजा निर्वळ असे आहे. पूजाच्या मृत्यूप्रकरणी पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्याविरुद्ध छळ केल्या प्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र फक्त गुन्हा दाखल करून पोलीस शांत बसले आहेत. या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत. लग्न झाल्यानंतर अवघ्या पाचव्या महिन्यातच पूजाने आत्महत्या केली होती. दुचाकी घेण्यासाठी पूजाच्या माहेरच्यांनी 50 हजार रुपये दिले नव्हते. याच कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिचा छळ केला जात होता. परिणामी या जाचाला कंटाळून तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं होतं.
दरम्यान, आमच्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस आम्हाला सहकार्य करत नाहीयेत, असा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर पोलिसांना याबाबत विचारलं असता या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.