बस स्टॉपवर रात्रीची विश्रांती जीवावर, मुंबईला निघालेल्या प्रवाशाची पुण्यात हत्या

| Updated on: Jul 16, 2021 | 12:56 PM

संजय पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. मात्र रात्री प्रवासाची सोय होऊ न शकल्यामुळे तो बस स्टॉपवरच झोपला. त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली.

बस स्टॉपवर रात्रीची विश्रांती जीवावर, मुंबईला निघालेल्या प्रवाशाची पुण्यात हत्या
पुण्यात बस स्टॉपवर प्रवाशाची हत्या
Follow us on

पुणे : पुणे स्टेशनजवळ बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईला जाण्यासाठी रात्रीच्या वेळेस प्रवासाची सोय न झाल्यामुळे प्रवासी स्टेशनजवळ असलेल्या एका बस थांब्यावर झोपला होता. यावेळी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याची हत्या करण्यात आली.

संजय बाबू कदम असे हत्या झालेल्या 35 वर्षीय प्रवाशाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील एका हॉटेलात संजय काम करत होता. संजय पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. मात्र रात्री प्रवासाची सोय होऊ न शकल्यामुळे तो बस स्टॉपवरच झोपला. त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

संजय बाबू कदम रात्री मुंबईतील घाटकोपरला जाण्यासाठी पुणे स्टेशनला आला. मात्र वाहतुकीचे साधन न मिळाल्याने साधू वासवानी चौक ते अलंकार थिएटर दरम्यान असलेल्या विजय सेल्स समोरील बस स्टॉपवर तो झोपला.

रात्री साडेबारा वाजल्यानंतर अज्ञात व्यक्तीने संजयच्या डोळ्यांच्या वर आणि डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये त्याच जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

चोरीच्या उद्देशाने हत्येचा संशय

चोरीच्या उद्देशाने संजयचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र त्याची हत्या कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक संतोष कांजळे यांनी फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या 

कुर्‍हाडीने वार करुन तरुणाची‌ हत्या, संशयित मेहुणा पसार

बाईकवर टेम्पो घातला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोलापुरात शिवसैनिकाची हत्या

(Pune Man killed on Bus Stop while sleeping who was about to travel Mumbai)