
पुणे | 26 सप्टेंबर 2023 : रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर… असं म्हणतात. हाताला आणि डोक्याला सतत काम पाहिजे, नाहीतर काही ना काही , भलभलते विचार डोक्यात येतात आणि त्रास होतो. अशाच एका रिकामं बसलेल्या, बेरोजगार असलेल्या इसमाने जे कृत्य केलं त्याने संपूर्ण शहरच हादरलं. एका बेरोजगार युवकाने त्याच्या जन्मदात्या आईवर हल्ला (attack on mother) करत तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर आईल वाचवण्यासाठी आलेल्या बहिणीवरही (sister injured) हल्ला केल्याने ती देखील जखमी झाली. हडपसर येथील बिनवत टाऊनशिप येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
साजिद पठाण असे हल्लेखोर आरोपीचे नाव असून क्षुल्लक कारणावरून त्याने नेहमीच कुटुंबियांशी भांडण व्हायचे. यापूर्वीही बऱ्यच वेळा त्यांच्यात वाद झाले होते. मात्र घटनेच्या दिवशी, शनिवारी , वादाने भीषण स्वरूप धारण केले. शनिवारी संध्याकाळी साजिदच्या आईने त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल काहीतरी चौकशी के ली, झालं.. साजिदचा तिथेच भडका उडाला. रागाच्या भरात साजिदने स्वयंपाकघरातील चाकू घेतला आणि त्याच्या आईवर वार केले.
मदतीसाठी त्या माऊलीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून साजिदची बहीण तिकडे धावत आली आणि समोरचं दृश्य पाहून तिचे डोळेच विस्फारले. आपलाच भाऊ आपल्याच आईवर हल्ला करतोय हे पाहून ती हबकली. मात्र भानवर येत ती आईच्या मदतीसाठी धावली. पण साजिद रागात वेडापिसा झाला होता, त्याला समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्याने थेट त्याच्या बहिणीवरही चाकूने हल्ला केला. यामध्ये त्याची बहीणही गंभीर जखमी झाली. त्यांच्या घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीसाठी धावत आले आणि त्यांनी साजिदला मागे खेचत धरून ठेवले. पोलिसांनाही कळवले.
या घटनेत त्याची आई व बहीण या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी पीडिता, रुबिना पठाण (आरोपीची बहीण) हिने तिचा भाऊ साजिद पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे त्याच्या कुटुंबाशी वारंवार वाद होत होते, यापूर्वीही अनेक वेळा भांडणं झालं होती. मात्र शनिवारी झालेले भांडण असे हिंसक स्वरूप धारण करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. या घटनेने धोकादायक वळण घेतले, ्खेर बहिणीने भावाविरोधात पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची पुढील चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.