Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या ‘त्या’ प्रश्नाने पोलीस निरुत्तर…

पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरातील बसमध्ये तरूणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्ता गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित तरुणीशी संवाद साधला. पण...

Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या त्या प्रश्नाने पोलीस निरुत्तर...
स्वारगेट अत्याचार प्रकरण
Image Credit source: social media
| Updated on: Mar 07, 2025 | 9:44 AM

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात (Swargate bus rape case) गेल्या आठवड्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षांच्या तरूणीवर अत्याचार करण्यात आला. आरोपी दत्ता गाडे याने तरूणीला फसवून दुसऱ्या बसमध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर एकदा नव्हे दोनदा अत्याचार केला, त्यानंतर तो फरार झाला. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी त्याला त्याच्या गुणाट गावातून बेड्या ठोकून अटक केली. न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीही ठोठावली. दरम्यान या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित तरूणीशी संवाद साधला. मात्र त्यावेळी पीडितेने विचारलेल्या एका प्रश्नामुळे अधिकारीदेखील निरुत्तर झाले आहेत.

तो एकच प्रश्न विचारला पण पोलीस निरुत्तर

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास ताब्यात घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्याप्रमाणे तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता. मात्र त्यावेळी पीडित तरूणीने अधिकाऱ्यांना एकच सवाल विचारला. ‘माझ्या बदनामीला जबाबदार कोण ?’ असा प्रश्न त्या तरूणीने अधिकाऱ्यांना विचारला, पण त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. तो प्रश्न ऐकून तपास अधिकारी देखील निरुत्तर झाले.

चौकशी दरम्यान आरोपी गाडेकडून उडवाउडवीची उत्तरं

दरम्यान स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी चौकशी केली. मात्र, गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे. गाडेचा मुक्कम सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांकडून नुकताच गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. तपासादरम्यान दत्ता गाडे याने उडवाउडवीची उत्तरं दिली.

असीम सरोदे यांचा अर्ज फेटाळला.

स्वारगेट एसटी स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या खोट्या, तसेच असंवेदनशील वक्तव्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारा ॲड. सरोदे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार, जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले आहेत, असे नमूद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हा अर्ज फेटाळला. पीडितेच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे आणि तिचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये रोखण्यासाठी मनाई आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे, असे पीडितेचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

दत्तात्रय गाडेबद्दल हादरवणारी माहिती समोर

आरोपी दत्तात्रय गाडेची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलिसांचा गणवेश परिधान केलेले दत्तात्रय गाडेचे छायाचित्र पोलिसांना मिळाले.