हगवणे तुला पश्चाताप होतोय का?; पत्रकाराच्या प्रश्नावर वैष्णवीच्या सासऱ्याची धक्कादायक प्रतिक्रिया

वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी ज्या प्रकारे उत्तर दिले ते पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

हगवणे तुला पश्चाताप होतोय का?; पत्रकाराच्या प्रश्नावर वैष्णवीच्या सासऱ्याची धक्कादायक प्रतिक्रिया
Rajendra Hagavane
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 23, 2025 | 3:45 PM

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलंय. या प्रकरणात फरार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना अखेर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून पहाटेच्या सुमारास अटक केली. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबानं सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप केलेत. या प्रकरणात आधीच वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक झाली होती. दरम्यान, राजेंद्रला अटक केल्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांना धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

वैष्णवी हगवणे हिनं मुळशी इथल्या सासरच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी अनिल कस्पटे यांनी, तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी शशांक, लता, करिश्मा, राजेंद्र आणि सुशील यांनी तिला मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला. लग्नात ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली तरी सासरच्या लोकांनी २ कोटींची मागणी केली, असं कस्पटे कुटुंबाचं म्हणणं आहे. वैष्णवीच्या शरीरावर जखमांचे डाग आढळल्यानं हे प्रकरण आत्महत्या की खून, याचा तपास अजून सुरू आहे.
वाचा: माझे पती नसताना हे लोक…; हगवणे कुटुंबीयांच्या मोठ्या सुनेचा खळबळजनक खुलासा

अटकेपूर्वी मटणावर ताव

राजेंद्र आणि सुशील सात दिवस फरार होते. अटकेपूर्वी ते एका हॉटेलमध्ये मटण खाताना सीसीटीव्ही फुटेजवर दिसले, ज्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला. पोलिसांच्या सहा पथकांनी कसून तपास केला आणि स्वारगेट परिसरातून त्यांना ताब्यात घेतलं. या अटकेनं बावधन पोलिसांना मोठं यश मिळालं.

पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्रचा माजोरडेपणा

अटक झाल्यावर पत्रकारांनी राजेंद्रला प्रश्न विचारले, “हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?” यावर राजेंद्रनं कोणताही खेद व्यक्त न करता उलट माजोरपणानं उत्तर दिलं. वर नकारार्थी आणि उद्दामपणे हात हलवत राजेंद्र हगवणेने नकार दिला. त्याच्या या वागण्यानं त्याच्याविरुद्धचा रोष आणखी वाढला. त्याचा हा माज पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना स्पष्ट दिसला, ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर टीका होत आहे.

राजकीय आणि सामाजिक पडसाद

राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा तालुका अध्यक्ष होता, पण या प्रकरणानंतर अजित पवारांनी त्याला आणि सुशीलला पक्षातून काढून टाकलं. सुप्रिया सुळे यांनीही निष्पक्ष तपासाची मागणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. वैष्णवीच्या १० महिन्यांच्या बाळाला तिच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र महिला आयोगानं मध्यस्थी केली.