कपड्यांच्या आत सोनं कसं लपवायचं… युट्यूबवरून शिकली; रंगेल बापाची लेक असलेली प्रसिद्ध अभिनेत्री तुरुंगात फोडतेय खडी

रामचंद्र राव यांची मुलगी रान्या राव हिला सोनं तस्करीमध्ये अटक करण्यात आली होती. पण तिने कपड्यांमध्ये सोनं कसं आणि कुठे लपवायचं हे कसं शिकली हे पाहून अधिकारी चक्रावले आहेत.

कपड्यांच्या आत सोनं कसं लपवायचं... युट्यूबवरून शिकली; रंगेल बापाची लेक असलेली प्रसिद्ध अभिनेत्री तुरुंगात फोडतेय खडी
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 20, 2026 | 1:15 PM

Ranya Rao : सध्या अनेक लोक दुसऱ्या देशांमध्ये जाऊन सोनं खरेदी करून ते भारतात घेऊन येण्याचा प्रयत्न करतात पण ते विमानतळावर चेकिंग करताना पकडले जातात. पण एक अशी अभिनेत्री जिने चक्क सोनं कुठे आणि कसे लपवायचे याबाबत तिने आखलेला प्लॅन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

ही घटना एखाद्या थरारक चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने दुबईहून भारतात सोने तस्करी करण्यासाठी आखलेली योजना अखेर उघडकीस आली आहे. ती सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. तिच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी सुरू असताना डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने जोरदार आक्षेप नोंदवत धक्कादायक खुलासे केले आहेत.

युट्यूबवरून आखला होता तस्करीचा प्लॅन

DRI ने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, रान्या राव हिने युट्यूबवरील व्हिडिओ पाहून कपड्यांमध्ये सोने लपवण्याच्या पद्धती जाणून घेतल्या होत्या. तपासात असेही स्पष्ट झाले आहे की ही कारवाई कोणतीही अचानक झालेली नव्हती तर ती पूर्णपणे नियोजनबद्ध होती. मात्र, यावेळी नशिबाने तिची साथ दिली नाही.

बेंगळुरू विमानतळावर अटक

3 मार्चच्या रात्री बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची गर्दी असतानाच DRI अधिकाऱ्यांची नजर 34 वर्षीय अभिनेत्री रान्या राव हिच्यावर गेली. जिने 2014 मध्ये ‘मानिक्या’ या चित्रपटातून कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

तपासणीदरम्यान रान्याच्या कपड्यांमध्ये 14 किलो 24 कॅरेट शुद्ध सोने लपवलेले आढळले. हे सोने छोटे-छोटे तुकडे करून शरीराला चिकटवलेले होते. काही तुकडे पिंडऱ्यांवर, कमरेवर, तर काही शूजमध्ये आणि खिशांमध्ये लपवण्यात आले होते. ही तस्करी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

अधिक ठरला होता प्लॅन

रान्याने चौकशीदरम्यान कबूल केले की तिला इंटरनेट कॉलद्वारे सतत सूचना दिल्या जात होत्या. तिला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3, गेट ‘A’ जवळ सोने उचलण्यास सांगण्यात आले होते. तेथे एका व्यक्तीने तिला दोन पॅकेट्स दिली. त्या व्यक्तीचे वर्णन करताना रान्याने सांगितले की तो सुमारे सहा फूट उंच होता.

तपासात समोर आले की रान्याने आधीच सर्व तयारी करून ठेवली होती. विमानतळावर कात्री मिळणार नाही त्यामुळे तिने विमानतळापासून काही अंतरावरील स्टेशनरी दुकानातून चिकट टेप खरेदी केली होती. एवढेच नाही तर टेपचे छोटे तुकडे आधीच कापून ती बॅगेत ठेवून आली होती. सोने मिळाल्यानंतर ती थेट वॉशरूममध्ये गेली आणि युट्यूबवर पाहिलेल्या पद्धतीनुसार सोने शरीराला चिकटवले.