मुलाच्या सासरच्यांसोबत टोकाचा वाद, माजी सैनिकाने थेट गोळ्या झाडल्या, दोघांचा मृत्यू

| Updated on: Sep 03, 2021 | 3:34 PM

उत्तर प्रदेशच्या इटावा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माजी सैनिकाने रागाच्या भरात त्याच्या मुलाच्या सासरच्यांवर गोळीबार केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

मुलाच्या सासरच्यांसोबत टोकाचा वाद, माजी सैनिकाने थेट गोळ्या झाडल्या, दोघांचा मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या इटावा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माजी सैनिकाने रागाच्या भरात त्याच्या मुलाच्या सासरच्यांवर गोळीबार केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी माजी सैनिक, त्याचा मुलगा आणि पत्नी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, आरोपीने आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं जास्त जरुरीचं होतं. कारण त्याच्या या क्रोधामुळे दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, असं मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केलं जातंय.

आरोपीचा मुलगा आणि सून यांच्यात सारखे वाद

संबंधित घटना ही इटावाच्या जसवंतनगर येथील कचौरा रोड परिसरात घडली आहे. आरोपी माजी सैनिकाचं नाव सर्वेश यादव असं आहे. सर्वेशच्या मुलाचं 26 जून 2020 रोजी मैनपुरी जनपद परिसरातील करहल भागात राहणाऱ्या नेहा नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. पण लग्नानंतर सर्वेशच्या मुलाचं आणि त्याच्या पत्नीचं जमत नव्हतं. त्यांच्यात वारंवार भांडणं सुरु होती.

मुलाच्या सासरच्यांवर गोळ्या झाडल्या

याच भांडणाला सोडवण्यासाठी नेहाच्या सासरची मंडळी आरोपी सर्वेशच्या घरी आली होती. मात्र दोन्ही पक्षांची बातचित सुरु असताना विषय भरकटत गेला. त्यामुळे मोठा वाद उफाळला. यावेळी सर्वेशने रागाच्या भरात आपली बंदूक काढून नेहाचा मामा आणि तिच्या बहिणीच्या सासऱ्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

आरोपीला बेड्या

संबंधित घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिथला पंचनामा केला. घटनास्थळी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसरी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलीस त्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जात होते. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता फॉरेन्सिक टीमदेखील तपास करत आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी आरोपी माजी सैनिकावर कारवाई करत त्याला आणि त्याच्या मुलाला आणि पत्नीला अटक केली.

प्रकरणाची दुसरी बाजूही समोर

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना आरोपीची नात शिवानी हिने महत्त्वपूर्ण माहिती दिली. आपण मामा-मामीसोबत बाजारात गेलो असताना तिथे मामीच्या माहेरची माणसंदेखील आली होती. त्यांनी तिथे बाजारात मामाला मारहाण केली होती. याच घटनेची माहिती मामाने घरी सांगितली तेव्हा घरातील सर्वजण नाराज झाले होते, अशी माहिती शिवानी हिने दिली. याच प्रकरणावरुन विषय वाढला आणि थेट हत्येपर्यंत घटना घडली.

हेही वाचा :

भांडणानंतर बायकोला घरात आसरा दिल्याचा राग, कोंबडी कापण्याच्या सुरीने पतीचा शेजारणीवर हल्ला

नांदेडमध्ये बापाकडून पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री, पोलिसात तक्रारीनंतर तरुणीची सुटका

मद्यधुंद पोस्टमास्तर ग्राहकाला भिडला, कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी