राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह अखेर सापडला, 2 दिवसांपासून बेपत्ता, आत्महत्या?

अखेर आज दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं. प्रथमदर्शनी तरी शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येतंय. मात्र यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह अखेर सापडला, 2 दिवसांपासून बेपत्ता, आत्महत्या?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2022 | 1:18 PM

योगेश बोरसे, पुणेः राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade) यांचा मृतदेह (Dead Body) सापडण्यात अखेर यश आलंय. दोन दिवसांपासून NDRF जवानांमार्फत नीरा नदीपात्रात हे शोधकार्य सुरु होतं. गुरुवारपासून शशिकांत घोरपडे बेपत्ता होते. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजनुसार, त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

शशिकांत घोरपडे हे गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी दुपारी पुण्याहून साताऱ्याकडे निघाले होते. मात्र ते घरी आलेच नाहीत. दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता. अखेर या तपासासाठी सीसीटीव्हीची मदत झाली. आज सकाळपासून नीरा नदीपात्रात त्यांचा शोध सुरु होता.

सीसीटीव्हीनुसार, पुणे ते सातारा मार्गात सारोळा गावाजवळ त्यांनी गाडी थांबवली. तिथून पुढे ते नीरा नदीच्या दिशेने चालत गेले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

शशिकांत घोरपडे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. साताऱ्यातल्या शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कालपासून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु होता.

सीसीटीव्ही फुटेजनुसार तसेच त्यांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन यावरून पोलिसांचा तपास सुरु होता. सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाशेजारी त्यांची कार आढळली. त्यानुसार कालपासून NDRF आणि स्थानिक रेस्क्यू टीम यांच्याकडून शशिकांत घोरपडे यांचा शोध सुरु होता.

अखेर आज दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं. प्रथमदर्शनी तरी शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येतंय. मात्र यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.