Shirdi Crime | साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

शिर्डीत स्पा सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आलीय.

Shirdi Crime | साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
Spa Center file photo
| Updated on: Oct 14, 2023 | 6:59 PM

अहमदनगर | 14 ऑक्टोबर 2023 : साईबाबांच्या शिर्डीत लाखो भाविक दररोज दर्शनाला येत असतात. शिर्डी आणि साईबाबांबद्दल भाविकांच्या मनात वेगळी आस्था आहे. साईबाबा आपल्या भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी धारणा आहे. त्यामुळे भाविक मनोभावे साईबाबांचं दर्शन घेतात. पण साईबाबांच्या याच शिर्डीत अनपेक्षित आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. शिर्डीत पोलिसांनी एका हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलाय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका बंगल्यात रिलॅक्स नावाच्या स्पा सेंटरमध्ये गैरकृत्य सुरु होते. पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या धडाकेबाज कारवाईतून दोन परराज्यातील पीडित तरुणींची सुटका केलीय.

शिर्डीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. स्पा सेंटरच्या नावाखाली एका घरात वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी छापा टाकत दोन परप्रांतीय पीडित तरूणींची सुटका केलीय. या कारवाईत पोलिसांनी अनिल भीमा भोसले या आरोपीस ताब्यात घेतलंय. तर मुख्य आरोपी गणेश कानडे हा फरार झालाय. उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केलीय. या प्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध या कायद्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फरार आरोपीच्या कूकृत्यांची मालिका

या प्रकरणातील फरार आरोपी गणेश कानडे याच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आलीय. गणेश कानडे हा याआधीदेखील देहविक्रीच्या प्रकरणातील आरोपी आहे. त्याची शिर्डीत दहशत आहे. तो पोलीस पकडतील या भीतीने वारंवार सीमकार्ड बदलतो. तसेच परराज्यातील किंवा मुंबई आणि नाशिक येथील मुलींना आणून स्पा सेंटरच्या नावाने सेक्स रॅकेट चालवतो. आरोपी गणेस कानडे हा पोलिसांना चकवा देत राहतो. तो चोरुन ग्राहकांशी संपर्क साधायचा आणि ग्राहकांना हॉटेलमध्ये मुली पुरवायचा. त्याच्या या कूकृत्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांना मिळाली.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी त्यांच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ग्राहक म्हणून अहमदनगर-मनमाड रोडच्या लगत असलेल्या बंगल्यात रिलॅक्स नावाच्या स्पा सेंटरमध्ये पाठवलं. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात पकडलं. तसेच या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार जिथे सुरु होता तो बंगला शिर्डी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर होता. या बंगल्यात लाईट्सचा चांगलाच झगमगाट होता, अशीदेखील माहिती समोर आलीय. पोलीस सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या शोधात आहेत.