आंबोलीत 24 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, रिक्षाचालकाचे प्रसंगावधान, दोनशे फूट खोल दरीतून बचाव

| Updated on: Jun 16, 2021 | 10:11 AM

24 वर्षीय तरुणीने जवळपास दोनशे फूट खोल दरीत उडी घेतली होती. मात्र वेळीच मदत मिळाल्यामुळे तिला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले

आंबोलीत 24 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, रिक्षाचालकाचे प्रसंगावधान, दोनशे फूट खोल दरीतून बचाव
आंबोलीत तरुणीची सुखरुप सुटका
Follow us on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील आंबोलीत खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला रेस्क्यू टीमने जीवदान दिलं. रिक्षा चालकाच्या प्रसंगावधानामुळे 24 वर्षीय तरुणीचा जीव वाचला. तरुणीने जवळपास दोनशे फूट खोल दरीत उडी घेतली होती. मात्र वेळीच मदत मिळाल्यामुळे तिला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. (Sindhudurg Amboli 24 years old girl suicide attempt in 200 feet deep Valley)

बस स्थानकातून रिक्षा पकडली

सिंधुदुर्गातील आंबोली बस स्थानकावरुन मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास एका युवतीने रिक्षा पकडली. रिक्षा चालक संजय पाटील यांना सावंतवाडीला जायचं असल्याचं सांगून ती बसली. रिक्षा सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान घाटात तिने दरड पडलेल्या ठिकाणी रिक्षा थांबवली. घाटातील नजारा बघण्याचं कारण देत ती घाटातील संरक्षक कठड्यावर चढली.

दोनशे फूट खोल दरीत उडी

युवतीचा आविर्भाव पाहून रिक्षाचालकाने तिला खाली उतरण्याची विनंती केली, परंतु तितक्यात तिने चप्पल आणि ओढणी संरक्षक कठड्यावर ठेवून खाली उडी मारली. तरुणी जवळपास दोनशे फूट खाली कोसळल्याचे बघून रिक्षा चालक घाबरला. भेदरुनच तो रिक्षा चालवत आंबोली पोलिस स्थानकावर आले व त्याने घडलेली घटना आंबोली पोलिसांना सांगितली.

तरुणीची सुखरुप सुटका

आंबोली पोलिस स्थानक प्रमुख बाबू तेली, दत्तात्रय देसाई आणि आंबोलीमधील रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते, आपत्कालीन व्यवस्थापन कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर पाऊस, वादळ-वारा अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिला धोक्यांवर मात करुन जिवंत बाहेर काढले.

आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अस्पष्ट

तरुणीला तात्काळ 108 रुग्णवाहिकेमधून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. यावेळी तिच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाल्याचे समजले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिचे नाव कमल असल्याचे स्पष्ट झाले. ती शिरोडा भागातील रहिवासी असून तिचे वय 24 वर्षे आहे. मात्र अशाप्रकारे तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला असावा याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.

पोलीस अधिक उपचारानंतर तिची माहिती गोळा करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची कारणे काय आहेत याबाबत तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस उपनिरीक्षक तोसिफ्र सय्यद, पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते उपस्थित होते. तर आपत्कालीन बचाव समितीतर्फे ही कामगिरी विशाल बांदेकर, अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, राकेश अमृतकर, अमरेश गावडे, दीपक मिस्त्री, हेमंत नार्वेकर, मायकल डिसोजा यांनी पार पाडली.

संबंधित बातम्या 

प्रेयसीचं लग्न ठरल्याने नाराजी, नायर रुग्णालयातील 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकललं

VIDEO | भगवती किल्ल्यावरुन तरुणी 200 फूट खोल दरीत, मृतदेहाजवळ केकचा बॉक्स सापडला

(Sindhudurg Amboli 24 years old girl suicide attempt in 200 feet deep Valley)