राजा रघुवंशीच्या बातम्या पाहू नकोस, हे सगळं..; रील पाहणाऱ्या महिलेला सोनमने काय सांगितलं?
29 वर्षीय राजा रघुवंशीने 25 वर्षीय सोनमशी 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर हे दोघं हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. 23 मे रोजी पूर्व खासी हिल्स इथल्या सोहरा परिसरातून हे दोघं बेपत्ता झाले होते. पोलिसांनी तपास घेताच राजचा मृतदेह 2 जून रोजी एका खोल दरीत आढळून आला होता. याप्रकरणी सोनमसह तिचा प्रियकर राज कुशवाह आणि विशाल चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांनाही अटक करण्यात आली आहे.

इंदूरच्या राज रघुवंशीच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. याप्रकरणी राजाची पत्नी सोनम रघुवंशीला पोलिसांनी अटक केली. आता या प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण करण्याच्या एक तासापूर्वी ती ज्या बसने प्रवास करत होती, त्यात तिच्या बाजूला बसून प्रवास करणाऱ्या एका महिलेनं जबाब नोंदवला आहे. उत्तरप्रदेशच्या या महिलेनं सोनमसोबत बसने प्रवास केल्याचा दावा केला आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत प्रमुख साक्षीदार उजाला यादव यांनी सांगितलं की सोनमच्या चेहऱ्यावर संताप स्पष्टपणे जाणवत होता. उजाला जेव्हा त्यांच्या मोबाइलमध्ये राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणातील इन्स्टाग्राम व्हिडीओ बघत होत्या, तेव्हा सोनमने त्यांना ‘हा सगळा मूर्खपणा’ असल्याचं सांगून व्हिडीओ न बघण्यास सांगितलं होतं.
8 जूनच्या रात्री सोनमसोबत प्रवास करताना नेमकं काय घडलं होतं, याची सविस्तर माहिती उजाला यादव यांनी दिली. त्या म्हणाल्या, “मी सोनमला वाराणसी कँटोनमेंट स्टेशनला भेटले होते. तिने तिचा चेहरा दुपट्ट्याने झाकला होता. तिच्यासोब दोन पुरुष होते, त्यापैकी एकाने त्याच्या तोंडावर पांढरा रुमाल बांधला होता. मी घरी जात असताना सोनमने मला रोखलं आणि गोरखपूर किंवा गाझीपूरला जाणारी कोणती बस आहे का, असं विचारलं होतं. मी तिला बस स्टँड दाखवला. त्यानंतर तेसुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील बसमध्ये बसले. सुरुवातीला ती त्या दोघांपासून वेगळी बसली होती. बसमध्ये ती मास्क घालून आणि मान खाली करून बसली होती. सोनमच्या बाजूला बसलेला एक प्रवासी उठल्यानंतर तिथे मी जाऊन बसली.”
या प्रवासादरम्यान सोनमने उजाला यांच्याकडून त्यांचा मोबाइल फोनसुद्धा मागितली होता. त्यात तिने एक नंबर टाइप करून नंतर तो डिलिट केला. फोन न लावताच सोनमने उजाला यांना मोबाइल परत केला. त्यानंतर सोनमने त्यांच्याकडे पाणीसुद्धा मागितलं होतं. प्रवासादरम्यान उजाला त्यांच्या फोनमध्ये इन्स्टाग्राम रील्स पाहत होत्या. त्यातील एक व्हिडीओ राजा रघुवंशीच्या आईचा होता. “मी तो व्हिडीओ बघत होती, तेव्हा ती मला म्हणाली, हे कसले मूर्खपणाचे व्हिडीओ तुम्ही पाहताय? हे व्हिडीओ बघू नका. मी लगेच माझा फोन बंद केला”, असं उजाला यांनी पुढे सांगितलं.
उजाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम सतत गोरखपूरला पोहोचण्यासाठी किती किलोमीटर शिल्लक आहे, असा प्रश्न विचारत होती. त्यानंतर उजाला त्यांच्या स्टॉपला उतरल्या आणि सोनम त्याच बसने पुढे गेली. नंतर नंदगंज पोलीस ठाण्याच्या काशी ढाब्यावर तिला पाहिलं गेलं. 9 जून रोजी सोनमला ताब्यात घेण्यात आलं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी उजाला यांना समजलं की, जी मुलगी त्यांच्या बाजूला बसलेली, ती सोनमच होती. कारण बातम्यांमध्ये सोनमचा फोटो दाखवण्यात आला होता आणि बसमध्ये बाजूला बसलेली मुलगीसुद्धा त्याच कपड्यांमध्ये होती. “ढाब्यावरील व्हायरल फोटोमध्ये सोनम त्याच कपड्यांमध्ये दिसली होती, जे तिने बस प्रवासादरम्यान घातले होते. त्यानंतर मी लगेच स्थानिक पोलिसांना आणि व्हायरल लग्नपत्रिकेवरील नंबरवरून राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. वाराणसीमध्ये सोनमसोबत दोन पुरुषसुद्धा होते. तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा सल्ला मी त्यांना दिला”, असं उजाला यांनी सांगितलं.
