
जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या शाहगंज तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. तीन बायकांनी आपल्या नवऱ्याला चोप चोप दिल्याची घटना घडली आहे. कोर्टाच्या परिसरातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या व्यक्तीने चार लग्नं केली होती. त्यापैकी तीन बायकांना सोडलं होतं. चौथी सोबत तो राहत होता. पहिल्या पत्नीला तर तिच्या मुलांनाही तो भेटू देत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या या तीन बायकांनी त्याला बेदम मार दिला. त्यानंतर लोकांनी या नवरोबाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
फजलुर्रहमान असं या व्यक्तीचं नाव आहे. तो वाराणासीच्या आदमपूर येथील पठानीटोला येथे राहतो. त्याने चार लग्न केले होते. त्याची पहिली बायको शाहगंज नगरच्या एराकियाना परिसरातील राहणारी आहे. त्याची दुसरी पत्नी कानपूरच्या जाजमऊ येथील रहिवासी आहे. तिसरी पत्नी आजमगडची आहे. मुलं झाल्यानंतर फजलुर्रहमानने त्यांना सोडून दिल्याचा या महिलांचा आरोप आहे. आता तो चौथ्या बायकोसोबत राहत आहे.
फजलुर्रहमानच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार त्यांना 13 वर्षाचा मुलगा आहे. तो फजलुर्रहमान सोबत राहतो. त्यासाठी त्याने एकतर्फी आदेश मिळवला होता. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल केल्यावर कोर्टाने पहिल्या पत्नीला मुलाला भेटण्याची परवानगी दिली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी तिला भेटण्याची परवानगी दिली. पण नवरा आपल्याला मुलाला भेटू देत नाही, असा या महिलेचा आरोप आहे.
गुरुवारी शाहगंज तालुक्यातील ग्रामीण न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. या सुनावणीला हजर राहण्यासाठी फजलुर्रहमान आला होता. तो येताच त्याच्या तिन्ही बायकांना त्याला धरलं आणि येथेच्छ धुलाई केली. कोर्टाच्या बाहेरच हा प्रकार घडला. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली.
त्यानंतर लोकांनी फजलुर्रहमानला पोलिसांच्या हवाली केलं. शाहगंज पोलिसांनी हा आपआपसातील वाद असल्याचं सांगितलं. तसेच दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, झालेल्या प्रकाराची सध्या उत्तर प्रदेशात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.