अंधेरीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, ‘इतक्या’ कोटींचा अंमली पदार्थाचा साठा जप्त

| Updated on: Mar 18, 2023 | 6:05 PM

मुंबईत ड्रग तस्करीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. या ड्रग कारवाईत करोडोचा ड्रग साठा जप्त करण्यात आला आहे. तस्करांनी ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी शक्कल लढवली होती, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच.

अंधेरीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, इतक्या कोटींचा अंमली पदार्थाचा साठा जप्त
एनसीबीकडून एमडी ड्रग जप्त
Follow us on

मुंबई : मागील काही महिन्यांत गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा गोरखधंदा उधळण्यात आला. सुरक्षा यंत्रणांनी धडाकेबाज कारवाई करून ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज तस्करांना चाप बसल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत होते. मात्र याचदरम्यान मुंबईमध्ये अंधेरी परिसरात खंडणीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईने ड्रग्ज तस्करांचा छुपा वावर पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पोलिसांनी अंधेरी परिसरातून ड्रग्ज तस्करांच्या ताब्यातील तब्बल आठ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

दोन आरोपींना अटक

विशेष म्हणजे हे अंमली पदार्थ गुजरातवरून आणण्यात आले होते. ते औषधांच्या पॅकेटमध्ये पॅकिंग करून ऑस्ट्रेलिया आणि लंडनला पाठवण्यात येणार होते. याचदरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाईचा धडाका लावून दोघा ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या अधिक चौकशीतून आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय असलेल्या ड्रग्ज तस्करांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता आहे.

कुरिअरच्या माध्यमातून करायचे परदेशात ड्रग्ज पुरवठा

अटक करण्यात आलेल्या दोघा तस्करांच्या चौकशीत पोलिसांना परदेशी कनेक्शनचा उलगडा झाला आहे. हे दोन आरोपी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज तस्करांच्या टोळीतील सदस्य आहेत. ते मुंबईतून प्रत्येक आठवड्याला तब्बल दहा किलोग्रॅम इतके वजनाचे अमली पदार्थ ऑस्ट्रेलिया आणि लंडनला पाठवत असायचे. कुरियर सर्विसच्या माध्यमातून या ड्रग्जची तस्करी केली जायची. यामध्ये प्रामुख्याने केटामाईन या अंमली पदार्थाचा समावेश असायचा.

हे सुद्धा वाचा

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचने अंधेरी परिसरातील कुरिअर सर्व्हिसच्या कार्यालयाची झडती घेतली. यावेळी तब्बल आठ कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. या ड्रग्जचा साठा गुजरातवरून मुंबईत आणला जायचा. अंधेरीमध्ये हा साठा औषधांसोबत पॅकिंग करून विदेशात पाठवला जायचा. दोन्ही आरोपींनी क्राईम ब्रांचमार्फत करण्यात आलेल्या अधिक चौकशीत तशी कबुली दिली आहे. दोघांना शनिवारी कनिष्ठ न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने दोघांचीही 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.