Pune Crime : जमिनीच्या वादातून फॉर्च्यूनर अंगावर घालण्याचा प्रयत्न, कोयत्याने तोडफोड, कुटुंबाला मारहाण
फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट रिव्हर्स कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादीचे वडील दीपक पवार यांना कारचा धक्का लागून दुखापत झाली आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळे गावात जमिन आणि पैशाच्या वादातून गंभीर प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. फॉरच्युनर कार आणि कोयते हातात घेऊन आलेल्यांनी एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करत गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.या प्रकरणात भोरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करीत आहेत.
याप्रकरणी विकी दीपक पवार (वय 27, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. सारोळा, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून विविध गंभीर कलमांसह आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष खोपडे हा फॉरच्युनर कार क्रमांक MH 12 TS 1818 मधून 5 अनोळखी इसमांसह फिर्यादीच्या घरासमोर आला. जमिनीच्या पैशाच्या कारणावरून वाद घालून आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केले. तसेच फिर्यादी विकी पवार, वडील दीपक, भाऊ अजय आणि वहिनी लता यांना मारहाण करण्यात आली.
थेट रिव्हर्सकार अंगावर घालण्याचा प्रयत्न
यावेळी आरोपींनी फिर्यादींना जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट रिव्हर्सकार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादीचे वडील दीपक पवार यांना कारचा धक्का लागून दुखापत झाली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना इथेच थांबली नाही. काही वेळाने रात्री आरोपींचे साथीदार पुन्हा पाच मोटारसायकलवरून गावात आले. कोयते हातात घेऊन त्यांनी फिर्यादीच्या घराचे दरवाजे, खिडक्या आणि मोटारसायकलची तोडफोड करीत उघडपणे दहशत निर्माण केली.
पोलीस पथके रवाना
या घटनेमुळे सारोळा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात कोयता हे हत्यार आणि फॉरच्युनर कार जप्तीच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करत असून आरोपी आणि त्यांचे अनोळखी साथीदार यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
